उत्तरप्रदेशात संशयित आरोपीला कह्यात घेण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांच्या पथकावर जमावाचे आक्रमण

पोलिसांवर आक्रमण होऊन त्यांना मार लागतो, यातून त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जात नाही का ? असाच प्रश्‍न पडतो.

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे, १२ मे – येथील एका पोलीस कर्मचार्‍याच्या हत्या प्रकरणात संशयित आरोपीला कह्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचे उत्तरप्रदेशात पथक गेले होते. साध्या वेशात असलेल्या पोलिसांना नागरिक समजून फरासखाना पोलीस ठाण्याच्या पथकावर उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथे जमावाने आक्रमण केले. जमावाने केलेल्या दगडफेकीत २ गाड्यांची हानी झाली असून कर्मचार्‍यांना किरकोळ मारही लागला आहे. या घटनेनंतरही पोलिसांनी संबंधित महिलेला कह्यात घेतले आहे, तिला घेऊन पोलिसांचे पथक पुण्याला निघाले आहे. मारहाण प्रकरणात ६ जणांना स्थानिक पोलिसांनी अटक केली आहे. स्थानिक माध्यमांनी ट्वीट केल्यानंतर या घटनेची माहिती समोर आली आहे.

बुधवार पेठेत तडीपार गुंड प्रविण उपाख्य पव्या श्रीनिवास महाजन याने १० मे या दिवशी पोलीस कर्मचार्‍यावर वार करून त्यांची हत्या केली होती. या गुन्ह्यात महाजन याला गस्तीवरील पोलिसांनी अटक केली होती. हत्येच्या घटनेच्या वेळी उपस्थित असलेली त्याची साथीदार महिला गाझियाबाद येथे पसार झाल्याची माहिती मिळताच पोलीस तिथे पोचले होते.