कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोनाच्या संसर्गाचा धोका टाळण्यासाठी प्रशासनाचा नियोजनशून्य आणि ढिसाळ कारभार !

एकीकडे सर्व आरोग्य यंत्रणा कोरोना रोखण्यासाठी जुंपली आहे; मात्र दुसरीकडे शासकीय कामकाजातील त्रुटी आणि ढिसाळपणा यांमुळे त्यावर पाणी फिरत आहे. या त्रुटींमुळे मनुष्यबळ, यंत्रणा, वेळ आणि पैसा यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. प्रशासकीय कामकाजातील त्रुटी टाळल्यास कोरोनाच्या विरोधातील लढा अधिक परिणामकारक होऊ शकेल. त्यादृष्टीने लक्षात आलेली सूत्रे या लेखाच्या माध्यमातून देत आहे.

संकलक : वैद्य उदय धुरी, मुंबई

कोरोना चाचणी केंद्रे २४ घंटे खुली ठेवणे आवश्यक

शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी मुंबई महानगरपालिकेची कोरोना चाचणी केंद्रे बंद ठेवली जातात. याचा परिणाम रुग्णांच्या आरोग्यावर होत आहे. त्यात अहवालही २४ घंट्यांमध्ये उपलब्ध होत नाही. रुग्णांची कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल मिळण्यास ३-४ दिवस जातात. त्यामुळे रुग्णाची प्रकृती खालावण्याची शक्यता निर्माण होते, तसेच रुग्ण कोरोनाबाधित असल्यास त्या व्यक्तीपासून घरातील आणि समाजातील नागरिकांना कोरोनाची लागण होण्याचा मोठा धोका संभवतो. हा धोका सर्वांत भयंकर असून यामुळे कोरोनाचा संसर्ग वेगाने होत आहे. त्यामुळे शासकीय सुट्ट्यांच्या दिवशी कोरोना चाचणी केंद्रे बंद न ठेवता ती २४ घंटे खुली ठेवायला हवीत.

सर्व कोरोना चाचणी केंद्रावर ‘रॅपिड’ आणि ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’ या दोन्ही चाचण्यांची सुविधा करणे अत्यावश्यक

कोरोना चाचणी केंद्रात काही ठिकाणी केवळ ‘रॅपिड’ चाचणी केली जाते. ही चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह) आल्यास त्या व्यक्तीला घरी जायला सांगितले जाते. एखाद्या व्यक्तीची ‘रॅपिड’ चाचणी नकारात्मक आली, तरी महत्त्वाची असलेली ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’ चाचणी जोपर्यंत ‘निगेटिव्ह’ येत नाही, तोपर्यंत ती व्यक्ती सुरक्षित आहे, असे म्हणता येणार नाही. ‘रॅपिड’ चाचणी ‘निगेटिव्ह’; मात्र ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’ चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्याचे अनेक प्रकार सध्या घडत आहेत. त्यामुळे ‘रॅपिड’ चाचणी झालेली व्यक्ती ‘आर्.टी.-पी.सी.आर्.’च्या अहवालानुसार कोरोनाचा प्रसारक ठरू शकते. हा धोका लक्षात घेऊन कोरोना चाचणी केंद्रावर वरील दोन्ही चाचण्यांची सुविधा निर्माण करणे आवश्यक आहे.

कोरोना चाचणीचा अहवाल मिळेपर्यंत व्यक्तीचे गृहविलगीकरण करणे आवश्यक

कोरोनाची चाचणी झाल्यानंतर व्यक्तीला घरी पाठवले जाते. अद्यापही अनेक कोरोना चाचणी केंद्रांवर २४ घंट्यांमध्ये अहवाल प्राप्त होत नाही. अहवाल मिळायला बहुतांश वेळा ३-४ दिवस इतका कालावधी जात आहे. अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यास काही अडचण नाही; मात्र अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यास काय होईल ? त्याचे चित्र डोळ्यासमोर उभे केल्यास त्याची भयावह परिणामकारता लक्षात येते; कारण अहवाल येईपर्यंत ती व्यक्ती स्वत:चे कुटुंब, वसाहत, बाजारपेठ आणि अन्यत्र मुक्तपणे संचार करते. त्यामुळे ही व्यक्ती या सर्वांना बाधित करत असते. यामुळे पुन्हा ती व्यक्ती संपर्कात आलेल्या सर्वांची सूची करून त्या सर्वांना गृहविलगीकरण होण्यास सांगण्याची वेळ प्रशासनावर येते. चाचणी करणार्‍या व्यक्तीचा अहवाल येईपर्यंत त्या व्यक्तीला गृहविलगीकरणात ठेवल्यास हा सर्व व्याप टाळता येईल. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर पडणारा अतिरिक्त भार, वेळ, श्रम आणि पैसा वाचेल. महत्त्वाचे म्हणजे त्यामुळे होणारा कोरोनाचा संसर्ग रोखता येईल, ही सर्वांत मोठी फलनिष्पत्ती ठरेल.

खासगी रुग्णवाहिकांच्या चालकांसाठी निर्बंध लागू करणे आवश्यक

शासकीय रुग्णालयांमध्ये आवश्यक रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांना खासगी वाहनाने येण्यास सांगितले जाते. ‘सिटी स्कॅन’ किंवा ‘एक्स् रे’ काढण्यासाठी येणार्‍या रुग्णांनाही खासगी रुग्णवाहिकेचा उपयोग करण्यास सांगितले जाते. या रुग्णांमुळे खासगी वाहनचालकाला संसर्ग झाल्यास अनेक नागरिकांची ने-आण करणारा चालक कोरोनाचा वाहक होऊ शकतो. रुग्णवाहिकेचे चालक पैसे घेण्यासाठी थेट रुग्ण असलेल्या कक्षामध्ये जातात आणि ते समाजातही मुक्तपणे फिरतात. त्यांच्यापासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होऊ शकतो. हे समाजासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे त्यांच्यासाठीही काही निर्बंध लागू करणे आवश्यक आहे.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org