नमाजपठणासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये !
रमझान ईदनिमित्त गृहविभागाकडून आदेश
अनेक मुस्लिमबहुल भागांत कोरोनाविषयी नियमांचे पालन होत नाही; तसेच धर्मांधांच्या आक्रमकतेमुळे पोलीस त्याकडे दुर्लक्ष करतात. लोकशाहीमध्ये नियम सर्वांना सारखा लागू असावा आणि त्याची कार्यवाहीही सर्वांसाठी समान असावी, अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा आहे.
मुंबई – रमझान ईदच्या निमित्ताने स्थानिक प्रशासनाने साहित्य खरेदीसाठी वेळेचे बंधन घालून दिलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यात यावे. त्या वेळेच्या व्यतिरिक्त बाजारामध्ये साहित्य खरेदीसाठी गर्दी करू नये. नमाजपठणासाठी मशिदीत किंवा मोकळ्या जागेत एकत्र येऊ नये, असे आवाहन गृहविभागाकडून मुसलमान समाजाला करण्यात आले आहे. १३ किंवा १४ मे या दिवशी असलेल्या चंद्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गृहविभागाकडून ही सूचना देण्यात आली आहे.
गृहविभागाकडून देण्यात आलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की, मुसलमानांचे नियमितचे नमाजपठण, तरावीह, इफ्तार यांसाठी मशिदीमध्ये अथवा सार्वजनिक ठिकाणी एकत्र न येता सर्व धार्मिक कार्यक्रम स्वत:च्या घरीच करावेत. रमझान ईद निमित्ताने कोणत्याही प्रकारे मिरवणुका, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक अथवा राजकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. रमझान ईदच्या दिवशी सामाजिक अंतर राखण्याच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करणे, तसेच मास्क आणि सॅनिटायझर यांचा उपयोग करणे अत्यंत आवश्यक आहे.