राज्यात ३१ मेपर्यंत दळणवळण बंदीची मंत्रीमंडळाची मागणी, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घोषित करतील ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री
मुंबई – राज्यात दळणवळण बंदीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील दळणवळण बंदी ३१ मेपर्यंत वाढवण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने घेतला आहे; मात्र याविषयीची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. १२ मे या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना त्यांनी वरील माहिती दिली. येत्या दळणवळण बंदीविषयी कोणते निर्बंध न्यून-अधिक करण्याविषयीची माहिती मुख्यमंत्री घोषित करतील, असे टोपे यांनी सांगितले.
या वेळी राजेश टोपे म्हणाले,
१. देशातील ३६ राज्यांतील कोरोनावाढीचा दर पाहिल्यास त्यामध्ये महाराष्ट्राचा ३० व्या क्रमांकावर आहे. हा दळणवळण बंदीचा परिणाम आहे.
२. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांचे आदर पुनावाला यांच्याशी बोलणे झाले आहे. २० मेपर्यंत २ कोटी लस देण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.
३. ४५ वर्षे वयोगटातील ज्या नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे, त्यांंना दुसरा डोस वेळेत देणे आवश्यक आहे. तसे केले नाही, तर पहिल्या डोसचा परिणाम रहाणार नाही. त्यामुळे ४५ वर्षे वयोगटातील लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
४. ज्यांना पहिला डोस दिला आहे. त्यांतील १६ लाख नागरिकांना ‘कोविशिल्ड’, तर ४ लाख नागरिकांना ‘कोव्हॅक्सिन’ चा दुसरा डोस देणे शिल्लक आहे. सध्या आपल्याकडे १० लाख डोसची व्यवस्था आहे. येत्या २-३ दिवसांत ४५ वर्षे वयाच्या पुढील नागरिकांना हे डोस देण्यात येतील.