कोरोनाबाधित मृताला खांदा देण्यासाठी २ सहस्र रुपये, तर नातेवाइकांना मुखदर्शन करण्यासाठी उकळले जातात १ सहस्र रुपये !
कानपूर येथील हॅलेट रुग्णालयातील कर्मचार्यांचे संतापजनक कृत्य !
|
कानपूर (उत्तरप्रदेश) – येथील हॅलेट रुग्णालयातील कर्मचार्यांकडून लोकांच्या असाहाय्यतेचा अपलाभ उठवला जात असल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयातील कर्मचार्यांकडून कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्यांना ४ कर्मचार्यांनी खांदा देण्यासाठी २ सहस्र रुपये, तर नातेवाइकांना मृताचे शेवटचे मुखदर्शन करण्यासाठी १ सहस्र रुपये उकळले जात आहेत. मृत कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाइकाचे रहाणीमान पाहून ही रक्कम उणे-अधिक केली जाते.
१. कोरोनाबाधित मृताचे शव रुग्णवाहिकेपर्यंत घेऊन जाण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांकडे प्रति कर्मचारी ५०० रुपये मागितले जातात.
२. अनेक शव भरलेल्या रुग्णवाहिकेत सर्वांत वर शव ठेवण्यासाठी संबंधित मृताच्या नातेवाइकाकडून वेगळे पैसे उकळले जातात.
३. जे पैसे देतील त्यांना अगदी मृतदेहावर हार आणि फुले वाहण्यासही अनुमती दिली जाते. इतकेच नव्हे, तर मृतदेहाला स्पर्श करू दिला जातो, तसेच छायाचित्रही काढू दिले जाते.
४. अशा प्रकारे ४ – ५ कर्मचारी एका दिवसाला ३० ते ४० सहस्र रुपये कमावत आहेत. याविषयी त्यांना विचारल्यावर ते ‘इतकेही पैसे मिळत नाही की आम्ही आमचा जीव धोक्यात घालू’, असे निलाजरे उत्तर देतात.
५. जर कुणा नातेवाइकाने नियमांवर बोट ठेवले किंवा कर्मचार्यांना पैसे देण्यास नकार दिला, तर त्याला कोरोनाचे नियम सांगून मृतदेहापासून दूर ठेवले जाते.