श्रद्धेने अन् गांभीर्याने शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले कै. मोहन चतुर्भुज (वय ६७ वर्षे) !
अत्यंत कठीण स्थितीतही अतिशय सकारात्मक राहून स्थिरतेने, श्रद्धेने अन् गांभीर्याने शेवटच्या क्षणापर्यंत नामजप करणारे पुणे येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले कै. मोहन चतुर्भुज (वय ६७ वर्षे) !
३०.४.२०२१ या दिवशी पुण्यातील साधक मोहन चतुर्भुज यांचे दुःखद निधन झाले. १३.५.२०२१ या दिवशी त्यांचा निधनानंतरचा चौदावा दिवस आहे. त्यांची सेवेची तीव्र तळमळ, १०० टक्के सकारात्मकता आदी गुणांविषयी सौ. मनीषा महेश पाठक यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. व्यष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून करणे
‘चतुर्भुजकाकांंचे मागील ४ मासांत स्वभावदोष आणि अहं निर्मूलन अन् भाववृद्धी यांसाठीचे प्रयत्न वाढले होते. ‘प.पू. गुरुदेव आहेत. तेच काळजी घेणार आहेत’, असे ते सारखे म्हणायचे. ‘ज्या प्रसंगात त्यांचा मनाचा संघर्ष व्हायचा, ते प्रसंग ते मोकळेपणाने सांगायचे आणि ‘त्यावर योग्य दृष्टीकोन काय आहे ? त्यावर कशी मात करू ?’, असे विचारून घ्यायचे. ‘स्वभावदोष आणि अहं यांच्या कुठल्या पैलूंमुळे मी न्यून पडतो आहे ?’, हे मनापासून लक्षात घेऊन त्यावर ते प्रयत्न करायचे.
२. सेवेची तळमळ असल्याने ती पूर्ण होईपर्यंत सेवेचा सतत ध्यास लागणे
चतुर्भुजकाकांना सेवेची तीव्र तळमळ होती. त्यांच्याकडे अनेक सेवांचे दायित्व होते. ते सेवेसाठी पुष्कळ कष्ट घ्यायचे. एखादी सेवा अपूर्ण राहिली असेल, तर ती पूर्ण होईपर्यंत काकांना त्या सेवेचा ध्यास लागलेला असायचा. त्यांच्या सेवेचा अनुभव आणि सेवेची मोठी व्याप्ती हे सर्व पहाता ते प्रत्येक सूत्र पूर्ण करायचे. त्यांच्या समवेत असलेल्या सहसाधकांना त्यांचा पुष्कळ आधार वाटायचा.
३. कै. मोहन चतुर्भुज यांची अनुभवलेली सकारात्मकता !
३ अ. कोरोना झाल्याचे समजल्यावर रुग्णालयात भरती होतांना ‘घरी परत येतांना दुचाकी गाडी लागेल’, या विचाराने स्वतःच दुचाकीवरून सर्व साहित्य घेऊन जाणे : काकांना कोरोना झाल्यानंतर आधुनिक वैद्यांनी त्यांना रुग्णालयात भरती होण्यास सांगितले. त्या वेळी ते पुष्कळ सकारात्मक होते. तेव्हा काका स्वतःच दुचाकीवरून घरी आले आणि रुग्णालयात भरती होण्यासाठी आवश्यक ते सर्व साहित्य घेऊन गेले. ‘घरी परत जातांना दुचाकी लागेल’, असा विचार करून ते घरून दुचाकी घेऊन गेले होते. इतकी त्यांच्या मनात सकारात्मकता होती.
३ आ. अतीदक्षता विभागात भरती केल्यानंतरही प्रतिदिन नामजपादी उपाय प्रामाणिकपणे पूर्ण करणे आणि वेळोवेळी भ्रमणभाष करून स्वतःच्या स्थितीविषयी सांगणे : प्रतिदिन सद्गुरु आणि संत यांनी सांगितलेले सर्व उपाय ते प्रामाणिकपणे पूर्ण करायचे. काका अतीदक्षता विभागात असतांना आणि त्यांना ‘ऑक्सिजन’ लावलेला असतानांही ते नामजप पूर्ण करायचा प्रयत्न करायचे. त्यांना बोलता येत असेल, तर भ्रमणभाष करून ‘नामजप होत आहे, स्थिती सकारात्मक आहे’, असे मला लगेच कळवायचे. ते स्वतःच्या दुखण्याविषयी कधीही भावनिक किंवा नकारात्मक झाले नाहीत. ते भ्रमणभाषवर मला म्हणायचे, ‘‘तुम्ही माझी काळजी करू नका. मी नामजप करत आहे. ‘तुम्ही तिकडे काकूंना आधार देत आहात’, तेच माझ्यासाठी पुष्कळ आहे.’’
४. रुग्णालयात स्थिरतेने रहाणे
चतुर्भुजकाकांचे वय ६७ वर्षे होते, तरीही ‘अशा स्थितीत मानसिक आधार असावा किंवा समवेत कुणीतरी असावे’, असे त्यांना वाटत नव्हते. त्यांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत त्यांना सांगितलेले उपाय आणि नामजप यांचा आढावा दिला. ‘त्यांनी आढावा दिला नाही’, असा एकही दिवस गेला नाही. ‘ऑक्सिजन लेव्हल’ किंवा जंतूसंसर्ग (‘इन्फेक्शन’) किती आहे ?’, हे ते स्वतःच मला सांगायचे. ते सांगतांनाही ते स्थिर असायचे. त्या वेळी ते एकदाही भावनाशील झाले नाहीत.
५. रुग्णालयातही प.पू. गुरुदेवांच्या अस्तित्वाची अनुभूती घेणारे चतुर्भुजकाका !
रुग्णालयात असतांना ते ‘मला प.पू. गुरुदेवांचे सूक्ष्मातील अस्तित्व प्रतिदिन जाणवते’, असेे सांगायचे. त्यांच्या निधनाच्या २ दिवस आधी त्यांनी ‘मला बरे वाटत आहे’, असा लघुसंदेशही केला होता. ‘मी लवकरच बरा होणार आहे, गुरुदेव समवेत आहेत. मला नामजपातून शक्ती मिळत आहे’, एवढेच त्यांच्या बोलण्यात असायचे.’
– सौ. मनीषा महेश पाठक, पुणे (४.५.२०२१)
|