लसींच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटाच्या लसी ४५ वर्षे वयोगटावरील व्यक्तींसाठी वापरणार ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – महाराष्ट्रात ४५ वर्षे आणि त्यापुढील, तसेच १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण चालू आहे; मात्र लसींच्या मागणीप्रमाणे त्याचा पुरवठा होत नाही. त्यामुळे १८ ते ४४ वर्षे वयोगटातील लसीकरण मंदावण्याची शक्यता आहे; कारण या वयोगटासाठीच्या लसी ४५ वर्षे वयोगटापुढील नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी वापरल्या जाणार आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ११ मे या दिवशी प्रसिद्धीमाध्यमांद्वारे दिली.

टोपे पुढे म्हणाले, ‘‘राज्यात सध्या ‘कोव्हॅक्सिन’चे ३५ सहस्र डोस उलपब्ध आहेत आणि दुसरा डोस द्यायच्या नागरिकांची संख्या ५ लाख इतकी आहे. १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठी राज्यशासनाने खरेदी केलेले पावणेतीन लाख आणि केंद्रशासनाकडून आलेले ३५ सहस्र, असे दोन्ही मिळून ३ ते सवातीन लाख ‘कोव्हॅक्सिन’चे डोस उपलब्ध आहेत. हे डोस ४५ वर्षे वयोगटापुढील नागरिकांच्या दुसर्‍या डोससाठी वापरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी माझे दूरभाषवरून बोलणे झाले आहे. त्यांच्याकडेही लसीचे डोस उपलब्ध नाहीत. त्यामुळे राज्याने खरेदी केलेली लस केंद्राच्या उद्दिष्टपूर्तीसाठी वापरावी लागत आहे. लस खरेदी करण्याची आमची सिद्धता आहे; मात्र ती नाही.’’