गोवा शासनाने कोरोनाबाधित रुग्णांसाठी रिकाम्या खाटांची माहिती ‘ऑनलाईन’ उपलब्ध करणे, हा जनहिताचा निर्णय ! – आरोग्य साहाय्य समिती
ऑक्टोबर २०२० मध्ये आरोग्य साहाय्य समितीने निवेदनाद्वारे केली होती मागणी !
पणजी (गोवा) – गोवा शासनाने ९ मे २०२१ या दिवशी राज्यशासनाच्या https://goaonline.gov.in/beds या लिंकवर कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयातील रिकाम्या खाटांविषयीची माहिती ‘ऑनलाईन’ उपलब्ध केली आहे. गोवा शासनाचा हा निर्णय रुग्णांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हितकारक असून आरोग्य साहाय्य समितीने यासाठी गोवा शासनाचे आभार मानले आहेत.
१. समितीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, नागरिकांना चांगले आरोग्य लाभावे आणि आरोग्य विषयक सुविधा मिळाव्यात, यासाठी कृतीशील असलेल्या आरोग्य साहाय्य समितीच्या वतीने २६ ऑक्टोबर २०२० या दिवशी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना निवेदन देण्यात आले होते. ज्यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी विविध मागण्यांसह ‘कोरोनाबाधित रुग्णांसाठी रुग्णालयातील रिकाम्या खाटांविषयीची माहिती शासकीय संकेतस्थळावर ‘ऑनलाईन’ उपलब्ध करण्याविषयी’ मागणी केली होती.
२. आरोग्य साहाय्य समितीने ‘रुग्णालयात भरती होण्यापूर्वी रुग्णांवर उपचारासाठी रिकाम्या खाटा आहेत कि नाही याची माहिती रुग्णांना नसते. यामुळे काही वेळा रुग्णांना उपचारासाठी रिकाम्या खाटा असलेले रुग्णालय शोधण्यासाठी अनेक रुग्णालयांमध्ये फिरत रहावे लागते. रुग्णालयांत खाटा उपलब्ध नसल्याने आणि वेळेत उपचार न मिळाल्याने अनेकांचे मृत्यू झाले आहेत. हे लक्षात घेऊन प्रत्येक रुग्णालयाने रुग्णालयात उपचारासाठी असलेल्या रिकाम्या खाटांविषयीची माहिती ‘ऑनलाईन’ उपलब्ध केल्यास त्याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा लाभ होईल. आपल्या रुग्णाला थेट खाटा उपलब्ध असलेल्या रुग्णालयात नेणे त्यांना शक्य होईल. त्यासाठी रुग्णालयांनी रुग्णालयात उपलब्ध रिकाम्या खाटांविषयीची माहिती शासकीय संकेतस्थळावरही उपलब्ध करणे आवश्यक आहे’, अशी मागणी केली होती.
३. या मागणीनुसार ‘गोवा शासनाने घेतलेला हा निर्णय व्यापक जनहिताचा असून त्याकरता आम्ही गोवा शासनाचे अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो’, असे आरोग्य साहाय्य समितीचे गोवा समन्वयक डॉ. मनोज सोलंकी यांनी सांगितले.