उत्तर आणि पूर्वाेत्तर भारत येथील वाचकांसाठी झालेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात जिज्ञासूंनी सांगितलेल्या अनुभूती
‘डिसेंबर २०२० मध्ये पाक्षिक हिंदी ‘सनातन प्रभात’च्या उत्तर आणि पूर्वाेत्तर भारतातील सर्व वाचकांसाठी ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळा आयोजित केला होता. त्या वेळी पू. नीलेश सिंगबाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्या सत्संग सोहळ्यात काही वाचकांनी सांगितलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. श्री. गोपाल पांडे, सैदपूर, वाराणसी, उत्तरप्रदेश.
१ अ. दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ वाचक सत्संग ऐकल्यापासून चांगले पालट होऊन जीवनात परिवर्तन होणे : ‘मी एका कार्यशाळेच्या माध्यमातून सनातन संस्थेशी जोडला गेलो होतो; परंतु नंतर व्यावहारिक कारणांमुळे संपर्कात राहू शकलो नव्हतो. दळणवळण बंदीच्या कालावधीत ‘ऑनलाईन’ वाचक सत्संग चालू झाल्यावर मी त्यात सहभागी झालो. तेव्हापासून माझ्यात चांगले पालट होऊ लागले. त्यामुळे माझ्या जीवनात परिवर्तन होत आहे.
१ आ. पूर्वी स्वतःकडे कर्तेपणा घेत असल्याने मन अस्थिर असणे आणि आता ‘सर्व परमात्म्याच्या कृपेने अन् इच्छेने होत आहे’, असे वाटत असल्याने मन स्थिर आणि शांत राहू लागणे : पूर्वी व्यावहारिक जीवनात ‘मीच सर्व करत आहे’, असे मला वाटत होते. माझ्या मनाप्रमाणे झाल्यावर मला चांगले वाटायचे आणि माझ्या मनाविरुद्ध घडल्यावर मला दुःख होत होते. आता ‘सर्व परमात्म्याच्या कृपेने आणि इच्छेने होत आहे’, असे वाटत असल्याने मी स्थिर आणि शांत राहू लागलो आहे. मला कठीण प्रसंगात भीती वाटत नाही. ‘जे होते, ते भल्यासाठीच होते’, असे मला वाटू लागले.
१ इ. समाजातील व्यक्तींना दत्तगुरूंचा नामजप करण्यास सांगणे आणि नामजप केल्यावर त्यांच्यात पालट होऊ लागणे : कोणतेही कार्य करतांना माझा नामजप चालू असतो. एकदा सत्संगात समष्टी साधनेचे महत्त्व सांगितले. तेव्हापासून कुणाशीही बोलतांना ‘सर्व काही भगवंताच्या कृपेनेच होत आहे’, असे प्रथम सांगून ‘कार्य, साधना आणि नामजप’ यांविषयीच माझे अधिक बोलणे होते. मी २० ते २५ जणांना दत्तगुरूंचा नामजप करायला सांगितला. त्यांना या देवतेविषयी पूर्वी काही ठाऊक नव्हते; परंतु ‘संतांनी सांगितले आहे, तर विश्वास ठेवून बघूया’, असे मी त्यांना सांगितले. त्यांनी नामजप चालू केल्यावर त्यांच्या जीवनातही पालट झाले.
२. अधिवक्ता अनय श्रीवास्तव, प्रयागराज, उत्तरप्रदेश.
२ अ. साधना सत्संगात स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेचे महत्त्व लक्षात येणे अन् स्वतःच्या चुकांचे निरीक्षण करून त्या सुधारण्याची जाणीव वाढणे : मी ‘ऑनलाईन साधना सत्संगा’त सहभागी झाल्यानंतर आणि कार्यशाळेत येऊन गेल्यानंतर स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचे महत्त्व माझ्या लक्षात आले. ‘स्वतःचे निरीक्षण करणे आणि प्रायश्चित्त घेऊन स्वतःत पालट करण्यासाठी प्रयत्न करणे’, यांचे महत्त्व मला समजले. माझ्याकडून काही चुका झाल्यास त्यांचे निरीक्षण आणि चिंतन केल्यानंतर ‘त्या सुधारण्यासाठी कसे प्रयत्न करायचे ?’, हे आता माझ्या लक्षात येऊ लागले आहे. ‘चुका सुधारणे का आवश्यक आहे ?’, याची जाणीवही आता वाढू लागली आहे.
२ आ. अधिवक्त्यांनी साधना करून आध्यात्मिक प्रगती केली, तरच ते हिंदु राष्ट्र निर्मितीच्या कार्यात योगदान देण्यास समर्थ होऊ शकतील ! : ‘नामजपाच्या आधारावरच आध्यात्मिक बळ वाढेल आणि हिंदु राष्ट्राची स्थापना होऊ शकेल. नामजपादी साधना सर्व विषयांचे मूळ आहे. आपली आध्यात्मिक प्रगती झाली, तरच आपण धर्मकार्यासाठी अधिवक्ता म्हणून हिंदु राष्ट्राच्या निर्मितीच्या कार्यात योगदान देण्यास समर्थ होऊ शकू’, असे मला वाटते.
३. अधिवक्ता संजीव तिवारी, प्रयागराज, उत्तरप्रदेश.
३ अ. नामजप चालू केल्यापासून झोप न येण्याची अडचण सुटणे आणि विचारांचे प्रमाण न्यून होऊन मनाची एकाग्रता वाढणे : ‘मला अनेक दिवसांपासून झोप न येण्याची अडचण होती. मी नामजपाला आरंभ केल्यानंतर माझी ही अडचण दूर झाली. काम करतांना माझ्या मनात अनेक अनावश्यक विचार येत होते; परंतु नामजप चालू केल्यानंतर माझ्या मनातील विचारांचे प्रमाण न्यून झाले आणि माझ्या मनाची एकाग्रता वाढली. नामजप करण्याचा मला निश्चितच लाभ होत आहे.’
४. कु. श्रेया केसरी, कतरास, झारखंड.
४ अ. प्रत्येक कृतीपूर्वी प्रार्थना करायला चालू केल्यापासून दैनंदिन जीवनात परिवर्तन होणे : ‘प्रार्थना चालू केल्यापासून माझ्या जीवनात पुष्कळ परिवर्तन झाले. मी पूर्वी प्रार्थना करत नव्हते. तेव्हा माझी संपूर्ण दिवस चिडचीड व्हायची. काही गोष्टींसंदर्भात मला आईचा राग यायचा. मी जेवण वाया घालवायचे. नंतर मी सकाळी उठल्यापासून प्रार्थना आणि सत्संगात सांगितलेली सूत्रे आचरणात आणू लागले, उदा. नामजपाला बसण्यापूर्वी प्रार्थना करून खोलीची स्वच्छता करणे, चादरीची घडी घालणे. मला सत्संगातून याविषयी माहिती मिळाली. त्यासाठी मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहे.’
५. श्रीमती स्वाती केसरी, कतरास, झारखंड.
५ अ. तीन वर्षांच्या मुलाने अजाणतेपणी कीटकनाशक द्रव्य प्यायल्याचे समजल्यावर कुटुंबियांनी घाबरून परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ प्रार्थना करणे : ‘माझा मुलगा ३ वर्षांचा आहे. तो नामजप करतो आणि दिवसभरात मधूनमधून ‘नारायण नारायण’ म्हणतो. एकदा तो खोलीत एकटाच असतांना त्याने थोडेसे कीटकनाशक द्रव्य प्यायले. त्यानंतर तो पुष्कळ खोकू लागला. खोकतांना त्याला उलटी झाली. काही वेळाने तो शांत झाल्यावर त्याने सांगितले, ‘‘मी ‘ऑलआऊट’ प्यायलो आहे.’’ तेव्हा आम्ही पुष्कळ घाबरलो. आम्ही सर्वांनी परात्पर गुरु डॉक्टरांना पुष्कळ प्रार्थना केली.
५ आ. आधुनिक वैद्यांनी मुलगा स्वस्थ असल्याचे सांगितल्यावर परात्पर गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटून ‘प्रार्थनेत पुष्कळ शक्ती असते’, अशी श्रद्धा निर्माण होणे : आम्ही त्याला आधुनिक वैद्यांकडे नेले. त्यांनी मुलाची तपासणी करून सांगितले, ‘‘मुलाच्या शरिरात कीटकनाशक द्रव्याचा थेंबही नाही. त्याला काहीच झाले नाही. तो अगदी स्वस्थ आहे.’’ तेव्हा आम्हाला परात्पर गुरुदेवांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि त्यांच्याप्रती विश्वास आणखी वाढला. आज त्यांच्या कृपेनेच माझा मुलगा स्वस्थ आहे. ‘प्रार्थनेत पुष्कळ शक्ती असते’, अशी माझ्यात श्रद्धा निर्माण झाली आहे.’
६. श्रीमती मंजू, सोनपूर, बिहार.
६ अ. सत्संग ऐकल्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांप्रती अतूट श्रद्धा निर्माण होणे आणि मिळकतीचा कसलाही स्रोत नसतांनाही गुरुदेवांच्या कृपेने संसार निर्विघ्नपणे चालू असल्याचे जाणवणे : ‘मी नियमितपणे ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकते. माझी आर्थिक स्थिति अत्यंत नाजूक आहे. मला मिळकतीचा कसलाही स्रोत नाही. सत्संगात सांगितलेल्या विषयामुळे माझी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अतूट श्रद्धा निर्माण झाली आहे. परात्पर गुरुदेवच माझा संसार चालवत आहेत. ते कधीही मला कशाची उणीव भासू देत नाहीत. मला पूर्वी पुष्कळ राग यायचा. आता सत्संगाशी जोडल्यामुळे आणि साधना केल्यामुळे माझा राग पुष्कळ न्यून झाला आहे. कठीण प्रसंगांतही मी स्थिर असते. माझ्यातील सहजताही वाढली आहे.’
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |