कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘या लेखात छापण्यात आलेले अनुभव वैयक्तिक आहेत. असे अनुभव प्रत्येकाचे असतीलच, असे नाही. तसेच यामध्ये अफवा पसरवण्याचा हेतू नाही. जनतेसमोर हे अनुभव ठेवण्यामागे ते प्रशासनापर्यंत पोचून त्यावर कार्यवाही व्हावी, हा उद्देश आहे. याचसमवेत लेखात उल्लेख केलेली रुग्णालये आणि आधुनिक वैद्य यांची नावे छापण्यामागे कुणाची मानहानी करण्याचा उद्देश नाही, तर आरोग्य व्यवस्थेत सुधारणा व्हावी अन् जनतेला दिलासा मिळावा, हा उद्देश आहे.’ – संपादक

एका शहरात रेमडेसिविरच्या काळ्या बाजाराविषयी एका महिला डॉक्टरांना आलेला अनुभव

रेमडेसिविरसाठी औषध दुकानदाराने २० सहस्र रुपये घेणे !

काही दिवसांपूर्वी माझे कुटुंबीय कोरोना ‘पॉझिटिव्ह’ (सकारात्मक) आल्याने त्यांना एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यांच्यातील एकाची प्रकृती खालावल्यामुळे डॉक्टरांनी रेमडेसिविर औषध देण्यास सांगितले; मात्र रुग्णालयात त्याचा मुख्य साठा संपलेला होता. शहरात अन्य ठिकाणीही इंजेक्शन शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र इंजेक्शन मिळाले नाही. अखेर एका नातेवाइकाने एका मेडिकल दुकानदाराचा संपर्क क्रमांक दिला. त्यांना दूरभाष केल्यानंतर त्यांनी रेमडेसिविर इंजेक्शनसाठी २० सहस्र रुपये देण्यास सांगितले. आम्हाला आमच्या नातेवाइकाचा प्राण वाचवायचा होता आणि इंजेक्शन कुठेही उपलब्ध नव्हते. त्यामुळे आम्ही २० सहस्र रुपये देऊन इंजेक्शन खरेदी केले आणि नातेवाइकाचे प्राण वाचले.

प्रशासन एवढे गाफील का राहिले ? काळाबाजार करणार्‍यांवर प्रशासन कठोर कारवाई करील का ?

या प्रसंगामुळे माझ्या मनात २ प्रश्‍न निर्माण झाले.

१. मागील वर्षभरापासून आपण कोरोनाशी दोन हात करत आहोत. यापुढे याहून गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, हे लक्षात घेऊन प्रशासनाने त्यासाठी आवश्यक ते नियोजन का केले नाही. पुढे येणार्‍या गंभीर परिस्थितीविषयी प्रशासन एवढे गाफील का राहिले ?

२. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नागरिकांनी एकत्र येऊन देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी शक्य होईल, तेवढे साहाय्य करायला हवे; मात्र काही स्वार्थी लोक या परिस्थितीचा अपलाभ घेत आहेत. नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. अशा पद्धतीने काळाबाजार करणार्‍या लोकांवर प्रशासन योग्य ती कठोर कारवाई करेल का ?

– एक हितचिंतक

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org