सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येणार नाही ! – संभाजीनगर खंडपीठ
कोरोनाच्या वृत्तांचा अतिरेक थांबवण्याविषयीची याचिका संभाजीनगर खंडपिठाने फेटाळली !
संभाजीनगर – मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठाने वृत्तवाहिन्यांकडून कोरोनाविषयक वृत्तांचा होणारा अतिरेक थांबवण्याची विनंती करणारी जनहित याचिका फेटाळली आहे. ‘सत्य आणि अचूक बातमी दाखवण्यापासून माध्यमांना प्रतिबंधित करता येत नाही. त्यामुळे ही याचिका खर्चासह फेटाळण्यात येत आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. येथील व्यापारी अमित कांतीकुमार जैन यांनी ही जनहित याचिका प्रविष्ट केली होती.
जैन यांच्या याचिकेनुसार ‘हिंदी, मराठी, इंग्रजी माध्यमांच्या वृत्तवाहिन्यांमधून दिवसभरात किमान १२ घंटे कोरोनाविषयक बातम्या सतत दाखवण्यात येतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात आजाराविषयीची भीती वाढत जाते. शिवाय यामुळे कोरोनाविषयी अपसमजही निर्माण होत आहेत. सतत स्मशानभूमीतील पेटत्या चिता, रुग्णालयाबाहेर रडणारे नातेवाईक हे दाखवले जात आहे. यामुळे नागरिकांचे विचार नकारात्मक होतात’, असे याचिकेत म्हटले आहे.
न्यायालयाने याचिका फेटाळतांना म्हटले आहे की, कोरोनाशी संबंधित खळबळजनक बातम्या दाखवण्यापासून माध्यमे आणि दूरचित्रवाहिन्या यांना प्रतिबंधित करा आणि त्यासाठी नियामक मंडळ स्थापन करा, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते; परंतु आम्ही अशा याचिकेची जनहित याचिका म्हणून कल्पना करू शकत नाही. याचिकाकर्ता हा वृत्तवाहिनीने खोटी बातमी दाखवली किंवा कोणती विशिष्ट बातमी खळबळजनक दाखवली, अशी तक्रार घेऊन आलेला नाही.