रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार !
बुलढाणा येथे ३ आरोग्य कर्मचार्यांना अटक
२ लाख ५४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त
|
बुलढाणा – येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ७ मेच्या रात्री शहरातील २ रुग्णालयांतील ३ आरोग्य कर्मचार्यांना रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करतांना अटक केली. या वेळी त्यांच्याकडून १६ इंजेक्शन, ७ सहस्र रुपये रोख, ३ भ्रमणभाष आणि २ दुचाकी वाहने, असा एकूण २ लाख ५४ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पथकाने सापळा रचून ३ आरोपींना २ ठिकाणांहून अटक केली. तिघेही कर्मचारी रुग्णालयांत काम करत होते. त्या दोन्ही रुग्णालयांना औषध दुकाने जोडलेली आहेत. त्यामुळे त्याच औषध दुकानांतून रेमडेसिविर इंजेक्शन घेऊन काळ्या बाजारात विकण्याचा धंदा चालू असल्याचा पोलिसांना संशय आहे.
नागपूर जिल्ह्यात २५ दिवसांत ३४ आरोपींना अटक
डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांचा समावेश !कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार ! आधुनिक वैद्य आणि परिचारिका हेच जर काळाबाजार करू लागले, तर त्यांच्यावर अन् आरोग्य यंत्रणेवर विश्वास तरी कोण ठेवणार ? |
नागपूर – अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गेल्या २५ दिवसांमध्ये जिल्ह्यातील विविध भागांत स्थानिक पोलिसांसह इतर विभागांच्या साहाय्याने १४ ठिकाणी धाडी घातल्या. त्यामध्ये रेमडेसिविरची ५२ इंजेक्शन जप्त करण्यात आली असून ३४ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करण्याच्या प्रकरणात आधुनिक वैद्य, परिचारिका तसेच काही आरोग्य कर्मचारी यांचा सहभाग आढळला आहे, असा दावा अन्न आणि औषध प्रशासन विभागाने केला आहे.