बोगस बियाणांची समस्या मुळापासून सोडवा !
‘वणी (यवतमाळ) तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पुरड (नेरड) येथील एका घरावर धाड टाकून १ लाख ८५ सहस्र ६१४ रुपयांचे कापसाचे प्रतिबंधित बनावट बियाणे कह्यात घेण्यात आले. खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन ही राज्यातील नगदी पिके आहेत. प्रतिवर्षी अस्मानी संकटामुळे ही पिके नेस्तनाबूत होतात. यामुळे त्रस्त असलेल्या शेतकर्यांचा अपलाभ घेऊन त्यांना लाखो रुपयांचे बनावट बियाणे विकले जाते. खरीप हंगामाला आरंभ होण्यापूर्वीच अशा घटनांनी शेतकरी हवालदिल झाला आहे. अशा बनावट बियाणांमुळे शेतकर्यांची प्रचंड हानी होते. ३ ते ४ मास तो त्या पिकाची मशागत करतो. वेळोवेळी पाणी, खते, कीटकनाशके यांवर व्यय करतो. शेवटी कापणीप्रसंगी त्याला बियाणे बनावट असल्याचे लक्षात येते; मात्र या संपूर्ण कालावधीत त्याने हिरव्या पिकांवर पाहिलेली स्वप्नेही चक्काचूर होतात.
बनावट बियाणे रोखण्यासाठी या वर्षी जळगाव जिल्ह्यात शासनाने १६ भरारी पथके नेमली आहेत. जिल्ह्याला लागून असलेल्या राज्य सीमेवर यांपैकी एक पथक २४ घंटे निगराणी ठेवणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. बनावट बियाणे विकणार्या दुकानदारांवर कारवाई करतांना असे बियाणे निर्माण करणार्यांचा शोध घेण्यासाठी पथके नेमायला हवी. कह्यात घेतलेल्या आरोपींना कठोर शिक्षा व्हायला हवी. गेल्या वर्षी बनावट बियाणांचा प्रकार मोठ्या प्रमाणात समोर आला होता. त्या वेळीच धडक आणि ठोस कारवाई झाली असती, तर यंदा असे बियाणे बाळगण्याचे कुणाचे धाडसच झाले नसते, असे म्हणण्यास वाव आहे. थोडक्यात प्रशासकीय कारवाईची जरब बसणे आणि कारवाई झपाट्याने, तसेच सर्वांगाने होणे समस्या सोडवण्यासाठी आवश्यक आहे. ते होण्यात कुठे त्रुटी आहेत ? याचाही शोध घ्यावा लागणार आहे. प्रशासकीय अधिकार्यांची संवेदनशीलता आणि समस्या सोडवण्याची इच्छाशक्ती किती आहे ? हेही पहावे लागेल. पालकमंत्री पाटील हेही एका शेतकरी कुटुंबातीलच आहेत. त्यामुळे मूळ समस्येवर घाव घालण्याची राजकीय इच्छाशक्ती आपल्याकडून अपेक्षित आहे, तरच अशा घटना रोखता येतील अन्यथा शेतकर्यांची हानी झाल्याविना रहाणार नाही !
– श्री. नीलेश पाटील, जळगाव.