वातावरण शुद्धीसाठी सोलापूर येथे एकाच वेळी ९०९ कुटुंबांनी केले गायीच्या गोवर्यांचे ज्वलन
उपक्रम राबवण्यात राम सेवा समितीसह अन्य संघटनांचा पुढाकार
सोलापूर – येथील राम सेवा समिती, राधारानी भजनी मंडळ, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, माहेश्वरी प्रगती मंडळ महिला शाखा यांच्या वतीने एकाच दिवशी एकाच वेळी ९०९ कुटुंबांनी देशी गायीच्या शेणाच्या गोवर्यांचे ज्वलन करण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून हवा शुद्ध होण्यासाठी, तसेच सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढण्यासाठी याचा मोठा लाभ झाला असल्याचे संयोजकांनी सांगितले. (वातावरण शुद्धीसाठी प्रयत्न करणार्यांचे अभिनंदन ! – संपादक)
१. वरुथिनी एकादशीच्या (भगवान श्री विष्णूची विशेष पूजा केली जाते, असे व्रत) मुहूर्तावर ७ मे या दिवशी सायंकाळी ६ वाजता हा उपक्रम घराघरांत राबवण्यात आला. या वेळी देशी गायीच्या २ गोवर्या, देशी गायीचे तूप, काही दाणे तांदूळ आणि थोडा कापूर यांद्वारे लहान होम करण्यात आला.
२. यानंतर प्रत्येकाने सहकुटुंब रामरक्षा पाठ करावा, असे आवाहनही राम सेवा समिती, राधारानी भजनी मंडळ, सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला संघटन, माहेश्वरी प्रगती मंडळ महिला शाखा यांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देऊन ९०९ कुटुंबांनी रामरक्षाही म्हटली. समस्त सोलापूरकरांनीही हा उपक्रम घरात करावा, असे आवाहन गोरक्षक गोपाल सोमाणी यांनी या वेळी केले.
कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात पालट व्हावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन ! – गोपाल सोमाणी, गोरक्षक
देशी गायीचे तूप आणि गोवर्या जाळल्याने हवेतील अनेक जंतू नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, हे संशोधनातून सिद्ध झाले आहे. त्यामुळे सध्याच्या कोरोनाच्या नकारात्मक वातावरणात पालट व्हावा, या हेतूने या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे गोरक्षक श्री. गोपाल सोमाणी यांनी सांगितले.