कोरोनाचे व्यवस्थापन प्रेरणादायी असल्याविषयी नीती आयोगाकडून मुंबई महापालिकेचे कौतुक !

मुंबई – मुंबई महापालिकेने कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतही उत्तम व्यवस्थापन केल्याने केंद्र सरकारच्या नीती आयोगाने या कामाचे कौतुक केले आहे. मुंबईच्या ऑक्सिजन वितरण प्रणालीचे सर्वोच्च न्यायालयानेही कौतुक केले. आता केंद्र सरकारच्या नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अमिताभ कांत यांनीही महापालिका आयुक्तांचे कौतुक केले आहे.


केंद्रीय पद्धतीने खाटांचे वाटप करणे, ऑक्सिजन साठवणुकीच्या सुविधांचा अंदाज घेणे, खासगी रुग्णालयातील खाटांचेही वाटप करणे आणि त्यावर देखरेख ठेवण्यासाठी डॅशबोर्ड सिद्ध करणे, रुग्णांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी वॉर रूम निर्माण करणे, अशी कामे महापालिकेने केली आहेत. ‘पालिकेचे कोरोनाचे व्यवस्थापन प्रेरणादायी आहे’, असे अमिताभ कांत यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.