नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही !

मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भूमिका !

नाना पटोले

मुंबई – समाजाला मागास ठरवण्याचा अधिकार केवळ केंद्रशासनाचा आहे. त्यामुळे नवीन आयोगाने काही साध्य होणार नाही, अशी स्पष्ट भूमिका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्र शासनाने लागू केलेले मराठा आरक्षण रहित करतांना सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेला गायकवाड समितीचा अहवालही रहित केला. त्यामुळे मराठा आरक्षणाविषयी राज्यशासन आता नवीन आयोग निर्माण करण्याच्या विचाराधीन आहे. याविषयी महाविकास आघाडतील घटकपक्ष असलेल्या काँगेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मराठा आरक्षणाविषयीची वरील भूमिका स्पष्ट केली.

या वेळी नाना पटोले म्हणाले, ‘‘निवडणूक हा प्रत्येक राजकीय पक्षाचा भाग असतो. प्रत्येक जण त्यांच्या पद्धतीने सिद्धता करत असतात. तशीच काँग्रेसही पूर्ण राज्यात सिद्धता करतो.’’

(म्हणे) ‘भाजप पोथी-पुराणवाले असून नियमित नवीन तारखा काढतात !’

पोथी-पुराण यांना दुय्यम लेखणारे पटोले यांनी हे लक्षात घ्यावे की, पोथ्या-पुराणे सहस्रावधी वर्षे टिकून आहेत; पण काँग्रेस आणखी किती काळ टिकणार, याची काँग्रेसवाल्यांनाही शाश्‍वती राहिलेली नाही !

भाजपला त्यांचे लोक पळून जातील, ही भीती आहे. त्यामुळे ते नवनवीन तारखा देत रहातात. भाजप पोथी-पुराणवाले असून नियमित नवीन तारखा काढतात. कायम कुणीतरी मरावे, यासाठी ते तारखा काढतात; पण महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, असे नाना पटोले म्हणाले.