नगर येथे विनापरवाना चालू असलेल्या ‘सॅनिटायझर’ कारखान्यावर पोलिसांची धाड
असे प्रकार नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर आहेत. राज्यात असे अन्यत्र होत आहे का ? याची तात्काळ आणि कसून पडताळणी होऊन योग्य कारवाई अपेक्षित आहे !
नगर – येथील श्रीगोंदा तालुक्यात एका पत्र्याच्या शेडमध्ये विनापरवाना चालू असलेल्या ‘सॅनिटायझर’ बनवण्याच्या कारखान्यावर औषध निरीक्षक अशोक राठोड आणि पोलीस पथकाने धाड टाकली. श्रीगोंदा पोलीस ठाण्यात विकास तिखे या कारखाना चालवणार्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली आहे. तेथून २ लाख १८ सहस्र रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. कोणतेही तांत्रिक ज्ञान आणि प्रशिक्षण नसतांना तेथे मोठ्या प्रमाणात ‘सॅनिटाझर’ बनवून विक्रीसाठी रुग्णालय, औषध दुकाने, आस्थापने या ठिकाणी पाठवण्यात येत होते.
ड्रममधील द्रव्याच्या साहाय्याने निळे डाय (रंग) पाणी आणि इतर ‘सोलूशन’ मिसळून ‘हँण्ड सॅनिटायझर’ सिद्ध केले जात होते. हे ‘सॅनिटायझर’ योग्य त्या मानकानुसार होते का ? धोकादायक होते का ? यासंदर्भात अद्याप माहिती मिळालेली नाही.