फलटण (जिल्हा सातारा) येथे रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे अटकेत !


सातारा, ९ मे (वार्ता.) – रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍या तिघांना फलटण पोलिसांनी अटक केली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या साहाय्याने ही कारवाई करण्यात आली असून यामध्ये एका परिचारकाचा समावेश आहे.

सुनील कचरे, प्रवीण सापते आणि अजय फडतरे अशी संशयितांची नावे आहेत. हे तिघे मिळून रुग्णांच्या नातेवाइकांना ३ सहस्र रुपयांचे इंजेक्शन ३५ सहस्र रुपयांना विकत होते. याविषयी माहिती मिळताच फलटण पोलीस तसेच अन्न आणि औषध प्रशासनाने तपासणी करून धडक कारवाई केली. या साखळीत अजून कोण आहेत याची माहिती पोलीस संशयितांकडून घेत आहेत.