कोरोनाबाधित रुग्णांची सेवा करण्यासाठी नागपूर येथील आधुनिक वैद्या अपूर्वा मंगलगिरी यांनी स्वतःचा विवाह मोडला !
|
नागपूर – शहरातील ‘सेंट्रल इंडिया कार्डिओलॉजी’ रुग्णालयात ‘फिजिशियन’ म्हणून काम करत असलेल्या आधुनिक वैद्या अपूर्वा मंगलगिरी यांचा विवाह २६ एप्रिल या दिवशी होणार होता; मात्र शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची सेवा आणि स्वतःचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतःचा विवाह मोडला. कोरोना संक्रमणाचा वाढता धोका आणि स्वतःचे कर्तव्य पाहून अपूर्वा यांनी वरपक्षाकडील मंडळींना विवाह पुढे ढकलण्यास सांगितले; मात्र त्यांनी ते अमान्य केले. त्यामुळे अपूर्वा यांनी विवाह करण्यास नकार दिला.
याविषयी आधुनिक वैद्या अपूर्वा मंगलगिरी म्हणाल्या, ‘‘सध्या कोरोना रुग्णांच्या सेवेपेक्षा कोणताही मोठा धर्म नाही. इतर कामांसाठी संपूर्ण आयुष्य पडले आहे. गेल्या वर्षी माझ्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे मी अशा कुटुंबांची असाहाय्यता आणि वेदना समजू शकते. ते अंथरुणावरून ऑक्सिजनपर्यंत साहाय्य मागतात. एक ‘कन्स्लटंन्ट फिजिशियन’ असल्याच्या नात्याने मला दिवसभर साहाय्य हवे असणार्या अनेक लोकांचे दूरभाष येत असतात. लोक निराशेत किंवा रागात माझ्याशी बोलतात. एक खाट आणि एक ‘ऑक्सिजन सिलेंडर’साठी ते माझ्या समोर हात जोडतात. अनेक वेळा मी केवळ असाहाय्य होऊन त्यांचे केवळ ऐकते. कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये रुग्णालयांत आधुनिक वैद्यांचा तुटवडा आहे. मी माझा प्रत्येक मिनिट केवळ कोरोना रुग्णांच्या साहाय्यासाठी देऊ इच्छिते. विवाह मोडण्याचा निर्णय कठीण होता. कदाचित् भविष्यात हा चुकीचाही ठरू शकतो; मात्र वर्तमानकाळाच्या हिशोबाने मी कठोर निर्णय घेतला आहे. या महामारीच्या काळात रुग्णालयात खाटा, ऑक्सिजन सिलिंडर, औषधे, व्हेंटिलेटर, आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांच्या तुटवड्याचा सामना करत आहोत. अशा वेळी माझ्या विवाहात सहभागी झालेले २०-२५ लोक दुसर्या दिवशी संक्रमित व्हावेत, असे मला वाटत नाही.’’
अपूर्वा यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी !
आधुनिक वैद्या अपूर्वा यांचे संपूर्ण कुटुंब त्यांच्या पाठीशी आहे. त्यांच्या या निर्णयाचा कुटुंबातील सर्वांना अभिमान आहे. याविषयी अपूर्वा म्हणाल्या, ‘‘विवाहाच्या १० दिवसांपूर्वी मी विवाह करण्याचा विचार सोडला होता. माझ्या रुग्णांना माझी आवश्यकता होती आणि माझ्या डोक्यात केवळ हेच विचार चालू होते. याविषयी मी आई आणि बहीण यांच्याशी चर्चा केली, तेव्हा त्या आनंदाने माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. जर मी कोरोना रुग्णांची सेवा करण्यात आनंदी असेन, तर त्यांनाही तेच हवे आहे.’’