योगगुरु स्वामी आध्यात्मानंद यांचे कोरोनामुळे निधन पंतप्रधानांकडून श्रद्धांजली अर्पण
कर्णावती (गुजरात) – येथील शिवानंद आश्रमाचे प्रमुख तथा प्रसिद्ध योगगुरु स्वामी आध्यात्मानंद (वय ७७ वर्षे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. आश्रमाचे विश्वस्त अरुण ओझा यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, स्वामीजी कोरोनाची बाधा झाल्यानंतर त्यांना १३ एप्रिल या दिवशी कर्णावती येथील एसीव्हीपी रुग्णालयात भरती करण्यात आले. तथापि ८ मे या दिवशी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी त्यांचे रुग्णालयातच निधन झाले. स्वामीजींनी देश-विदेशांत ८१४ शिबिरे घेऊन लोकांना योग, प्राणायम आणि चिंतन यांचे धडे दिले. त्यांनी वर्ष १९९९ मध्ये न्यू मेक्सिको येथील चियापास येथे झालेल्या ‘विश्व शांती संमेलना’त भारताचे प्रतिनिधित्व केले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामीजींना श्रद्धांजली वाहिली. त्यांनी ट्वीट करून म्हटले, ‘‘योगगुरु स्वामी आध्यात्मानंद यांच्या निधनाचे वृत्त ऐकून दुःख झाले. त्यांनी अध्यात्मासारखा गहन विषय सोप्या शैलीत समजवला. त्यांनी समाजाला योग शिकवण्यासह कर्णावती येथे शिवानंद आश्रमच्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमांतून समाजसेवाही केली आहे. मी स्वामीजींना श्रद्धांजली अर्पित करतो. ॐ शांती !’’