कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी तात्काळ नवा टूथब्रश वापरणे आवश्यक ! – तज्ञांचा सल्ला

नवी देहली – कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी स्वतःचा जुना टूथब्रश टाकून देऊन नवा टूथब्रश वापरावा, असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. ‘कोरोनाच्या संक्रमणाच्या वेळी आणि त्यातून बरे झाल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे’, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे. कोरोनाचा पुन्हा संसर्ग टाळण्यासाठी आणि प्रसाधनगृह वापरणार्‍या घरातील अन्य सदस्यांना संसर्ग होऊ नये, यासाठी असे करणे आवश्यक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

१. नवी देहली येथील ‘लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज’च्या ‘डेंटल सर्जरी’ विभागाचे प्रमुख डॉ. प्रवीण मेहरा म्हणाले की, जे रुग्ण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आहेत, त्यांनी तात्काळ नवीन टूथब्रशचा वापर करायला हवा. त्यामुळे संबंधित व्यक्तीकडून घरातील इतर सदस्यांना, तसेच इतरांना कोरोनाची बाधा होण्याची शक्यता अल्प रहाते.

२. ‘आकाश हेल्थकेअर सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल’च्या डॉ. भूमिका मदान म्हणाल्या की, मी या गोष्टीशी सहमत आहे; कारण सर्दी, खोकला आणि ताप यांतून बरे झालेल्यांनी टूथब्रश पालटणे त्यांच्या लाभाचे आहे. जर एखादा रुग्ण कोरोनातून बरा झाला असेल, तर त्याने लक्षणे दिसल्याच्या २० दिवसानंतर त्याचा टूथब्रश आणि ‘टंग क्लिनर’ही पालटणे आवश्यक आहे. टूथब्रशवर काही काळानंतर बॅक्टेरिया निर्माण होतो.