‘डी.आर्.डी.ओ.’च्या ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या कोरोनाप्रतिबंधात्मक औषधाला मान्यता

ऑक्सिजनचे अवलंबित्व न्यून करते !

नवी देहली – संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (‘डी.आर्.डी.ओ.’ने) विकसित केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक ‘२ डीऑक्सी-डी-ग्लुकोज’ (२-डीजी) या औषधाला औषध महानियंत्रकांनी आपत्कालीन वापरासाठी संमती दिली आहे. हे औषध कोरोनाची सौम्य ते तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांवर ‘साहाय्यक उपचार पद्धत’ म्हणून वापरले जाईल. २-डीजी हे औषध पावडरच्या स्वरूपात येते. ते पाण्यात मिसळून घेतले जाते.

१. संरक्षण मंत्रालयाने सांगितले, ‘२-डीजी’ हे औषध रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णांना लवकर बरे होण्यास साहाय्य करत असल्याचे, तसेच ऑक्सिजनच्या अतिरिक्त पुरवठ्यावरील त्यांचे अवलंबित्व न्यून करत असल्याचे चाचण्यांमध्ये आढळून आले आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत फार मोठ्या संख्येतील रुग्ण ऑक्सिजनवर अवलंबून असून त्यांना रुग्णालयात भरती होण्याची आवश्यकता आहे. संसर्ग झालेल्या पेशींमध्ये हे औषध ज्या रीतीने कार्य करते, ते पहाता हे औषध रुग्णांचा जीव वाचवेल, अशी अपेक्षा आहे. या औषधामुळे कोरोना रुग्णांचा रुग्णालयातील वास्तव्याचा कालावधीही न्यून होईल. या औषधाचे सहजरीत्या उत्पादन करता येऊन ते देशात मोठ्या प्रमाणात उपलब्ध केले जाऊ शकते, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

२. ‘२-डीजी’ हे औषध विषाणूचा संसर्ग झालेल्या पेशींमध्ये जमा होते आणि ते विषाणूच्या वाढीला प्रतिबंध करते. नेमक्या विषाणू संसर्गित पेशींमध्ये जमा होणे, हे या औषधाचे वैशिष्ट्य आहे.