भाजपच्या वतीने ऑक्सिजनची आवश्यकता असणार्या गरजू रुग्णांसाठी ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ बँकेची विनामूल्य सेवा कार्यरत !
कोल्हापूर, ९ मे – भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये भाजप कार्यालयात विनामूल्य ‘ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीन’ बँक सेवेचा प्रारंभ करण्यात आला. कोल्हापूर शहरात भाजपच्या बिंदू चौक येथील कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ८ मे या दिवशी शुभारंभ करण्यात आला.
या वेळी चंद्रकात पाटील म्हणाले, ‘‘कोरोना रुग्ण बरा होऊन घरी गेल्यावर शरीराची श्वसनक्रिया नैसर्गिक पद्धतीने चालू होण्यासाठी साहाय्य करणारे हे उपकरण अत्यंत उपयुक्त ठरत आहे. हे मशीन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापरायचे आहे. मशीनची खरेदी रक्कम सध्या चढ्यादराने होत असून सामान्य नागरिकांना एक स्वतंत्र मशीन खरेदी करणे परवडणारे नाही. त्याचबरोबर भाडेतत्त्वावरही अशा मशीन आता उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे सामान्य माणसाचा विचार करता ही सेवा विनामूल्य पुरवण्यात येत आहे. एका रुग्णाकडून हे मशीन वापरून परत आल्यानंतर ते व्यवस्थित सॅनिटाईज करून दुसर्या रुग्णाला वापरण्यासाठी दिले जाणार आहे.’’ या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, अशोक देसाई, विठ्ठल पाटील, विजय जाधव, दिलीप मेत्रानी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांसह अन्य उपस्थित होते.