जालना येथील सर्व रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना विनामूल्य जेवणाचे डबे पोचवले जातात !

सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय काकडे यांचा आदर्श उपक्रम !

यातून इतरांनी बोध घेऊन असा उपक्रम चालू करावा !

प्रतिकात्मक छायाचित्र

जालना – येथील रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. दत्तात्रय काकडे यांचा ‘ट्रान्सपोर्ट’चा व्यवसाय आहे. त्यांचे शहरापासून काही अंतरावर असलेल्या खादगाव रस्त्यावर शेत आहे. या शेतातच गेल्या १३ दिवसांपासून तंबू ठोकून काकडे हे प्रतिदिन शेतात सिद्ध केलेले जेवणाचे डबे शहरातील विविध रुग्णालयांत असलेले कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांना विनामूल्य पोचवतात.

श्री. दत्तात्रय काकडे यांच्या कार्यालयात काम करणारे सहकारी, तसेच त्यांचा परिवार मोठा असल्यामुळे अनुमाने १५ ते २० घरचीच माणसे आहेत. त्यामुळे शेतामध्ये चालू केलेल्या या अन्नदानाच्या यज्ञामध्ये आप्तेष्ट, शेजारी आणि सेवाभाव जपणारे लोक यांनी स्वतःला झोकून दिले आहे. कोणत्याही उत्पन्नाच्या लालसेपोटी काम न करता सेवाभाव म्हणून सर्वजण हे काम करत आहेत. प्रतिदिन अनुमाने ५० सेवेकरी सकाळी ६ ते ९.३० आणि दुपारी ४ ते सायंकाळी ७ या वेळेत डबे बनवण्याची प्रक्रिया करत आहेत.

‘केवळ समाजकार्य करतो’, असा गवगवा न करता काकडे आणि त्यांचे सहकारी प्रत्येक रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्या हातात डबा पोचेल अशी काळजी घेतात. ‘ट्रान्सपोर्ट’च्या व्यवसायातील अनुभव कामाला आणून त्यांनी त्या पद्धतीने नोंदणी चालू केली. त्यासाठी महत्त्वाच्या कोविड रुग्णालयांच्या बाहेर फलक लावून त्यावर नोंदणीसाठी क्रमांक दिलेले आहेत.

ज्या वेळेस डबा घेऊन वाहन त्या रुग्णालयात जाते, त्या वेळी त्या संबंधित रुग्णांच्या नातेवाइकांना बोलावून त्यांच्या हातात डबा दिला जातो. पूर्वनोंदणी असल्याविना रुग्णांना डबा मिळत नाही. त्यामुळे चांगल्या पद्धतीने हे वाटप चालू आहे. त्याचसमवेत नोंदणी केली असेल आणि डबा न मिळाला, तर तक्रार करण्याचीही सुविधा देण्यात आली आहे. त्याचीही तत्परतेने नोंद घेऊन संबंधित रुग्णाला डबा पोचवण्याची व्यवस्था केली जाते.