कोरोना संसर्गाच्या काळात देशातील अधिकोषांमध्ये ६३ सहस्र अपव्यवहारांच्या तक्रारी !
आपत्काळात देशातील अधिकोषांमध्ये अपव्यवहार होणे हे चिंताजनक !
नागपूर – १ एप्रिल ते ३१ डिसेंबर २०२० या कोरोनाच्या संसर्गाच्या काळात देशातील विविध अधिकोषांमध्ये (बँक) ६३ सहस्र ३४५ अपव्यवहारांची नोंद करण्यात आली आहे. यात ९९ सहस्र ८६३ कोटी रुपये गुंतले होते, अशी माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून माहिती अधिकार कायद्याच्या माध्यमातून देण्यात आली. अपव्यवहारात अधिकोषांतील कर्मचार्यांच्या सहभागाची माहिती उपलब्ध नाही, असेही या अधिकोषाकडून सांगण्यात आले आहे. येथील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती अधिकाराच्या माध्यमातून ही माहिती विचारली होती. त्यांनी देशातील किती अधिकोषांमध्ये अपव्यवहार झाले? त्यापैकी अधिकोषांतील कर्मचार्यांनी किती केले ? त्यात किती रकमेचा समावेश होता ? अधिकोष कामकाजाविषयी किती तक्रारी आल्या ? अधिकोष विलिनीकरणाच्या निर्णयानंतर किती शाखा बंद पडल्या ? यांसह इतरही काही माहिती मागवली होती. कोरोना काळात अधिकोषाच्या कामकाजावर मर्यादा आल्या होत्या. निम्म्याच कर्मचार्यांच्या माध्यमातून अधिकोषात कामकाज चालवले जात होते. ग्राहकांच्या गर्दीवरही प्रतिबंध घालण्यात आले होते. अशा स्थितीत देशभरातील विविध अधिकोषांमध्ये झालेले अपव्यवहार अधिकोषांच्या एकूणच पारदर्शीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे आहेत. वरील कालावधीत देशातील अधिकोषांच्या कामकाजाविषयी एकूण ३ लाख २० सहस्र ७०३ तक्रारी आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली.