१२.५.२०१९ या दिवशी महर्षि मयन यांच्या आज्ञेने रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या विष्णुयागाचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेल्या कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त महर्षि मयन यांनी सांगितल्याप्रमाणे १२.५.२०१९ या दिवशी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी श्रीविष्णुयाग केला. या यागाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण आणि मला आलेल्या अनुभूती येथे देत आहे.
१. साधक पुरोहितांनी ‘पुरुषसूक्त’ आणि नंतर ‘विष्णुसूक्त’ म्हणत यज्ञात तुपाच्या १६ वेळा आहुती दिल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
अ. साधक पुरोहितांनी प्रथम ‘पुरुषसूक्त’ आणि नंतर ‘विष्णुसूक्त’ म्हणत यज्ञात तुपाच्या १६ वेळा आहुती देण्यात आल्या. पुरुषसूक्त चालू असतांना निर्गुण ईश्वरी तत्त्व आणि विष्णुसूक्त चालू असतांना निर्गुण विष्णुतत्त्व पूजनाच्या ठिकाणी कार्यरत झाले.
आ. पुरुषसूक्ताच्या वेळी यज्ञस्थळी ईश्वराची तारक शक्ती निर्गुण स्तरावर आणि विष्णुसूक्ताच्या वेळी श्रीविष्णूची मारक शक्ती सगुण स्तरावर कार्यरत झाली.
२. पुरुषसूक्त आणि विष्णुसूक्त चालू असतांना सद्गुरुद्वयींच्या संदर्भात जाणवलेली सूत्रे
पुरुषसूक्त चालू असतांना सद्गुरुद्वयींनी ज्ञानमुद्रा (अंगठ्याचे टोक तर्जनीच्या टोकाला लावणे) केली होती आणि त्या जागृत ध्यानावस्थेत असल्याचे जाणवले. तेव्हा त्यांच्यामध्ये ईश्वराचे निर्गुण चैतन्य कार्यरत असल्याचे जाणवले. जेव्हा विष्णुसूक्त चालू होते, तेव्हा सद्गुरुद्वयींमध्ये सुप्तावस्थेत असणारे लक्ष्मीतत्त्व प्रकट होऊन कार्यरत झाल्याचे जाणवले.
३. यज्ञात तूप मिश्रित पांढर्या तिळांच्या आहुत्या देणे
तुपाकडे चैतन्य आणि पांढर्या तिळांकडे निर्गुण तत्त्व आकृष्ट होते. देवतांना पांढरे तीळ प्रिय असतात, तर पितरांना काळे तीळ प्रिय असतात. तूपमिश्रित पांढर्या तिळांची आहुती यज्ञात दिल्यामुळे देवता लवकर प्रसन्न होतात. विष्णुयागात तूप मिश्रित पांढर्या तिळांच्या आहुती दिल्यामुळे श्रीविष्णूने तिळांची आहुती आनंदाने ग्रहण केली. त्यामुळे यज्ञस्थळी विष्णुतत्त्व जागृत होऊन यज्ञस्थळी विष्णुतत्त्वमय शुद्ध चैतन्य कार्यरत झाले आणि वातावरणाची, तसेच साधकांच्या सूक्ष्म देहांची शुद्धी झाली. तेव्हा यज्ञातील धुरामध्ये फिकट निळसर रंगाची छटा निर्माण झाल्याचे दिसले.
४. निर्गुण विष्णुतत्त्वाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
जस-जसे यज्ञातील निर्गुण विष्णुतत्त्वाचे प्रमाण वाढत होते, तस-तसे यज्ञातील धुरामध्ये ‘ॐ’च्या आकृत्या निर्माण होऊन त्यांतून आेंकाराचा सूक्ष्म नाद ऐकू येत होता. तेव्हा स्थूल देहाला सूक्ष्मातून बर्फाप्रमाणे शीतल स्पर्श झाल्याचे जाणवले.
५. पूजेतील श्रीविष्णूच्या चतुर्भुज रूपातील चित्राच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
यज्ञस्थळी एकाच वेळी श्रीविष्णूचे सगुण आणि निर्गुण तत्त्व कार्यरत झाले होते. त्यामुळे पूजेतील श्रीविष्णूच्या चतुर्भुज रूपातील चित्राच्या जवळ श्रीविष्णूचे सगुण तत्त्व कार्यरत असल्यामुळे हे चित्र जवळून सुस्पष्ट दिसत होते, तर चित्रापासून काही अंतरावर श्रीविष्णूचे निर्गुण तत्त्व कार्यरत असल्यामुळे हे चित्र लांबून अस्पष्ट दिसत होते.
६. विष्णुतत्त्वाने ६ व्या आणि ७ व्या पाताळांतील मोठ्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून घनघोर युद्ध करणे
यज्ञस्थळी कार्यरत झालेल्या विष्णुतत्त्वाने ६ व्या आणि ७ व्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून घनघोर युद्ध करून त्यांना नष्ट केले. तेव्हा यज्ञाच्या ज्वाळांमध्ये सूक्ष्म वाईट शक्ती जळल्यामुळे घाणेरडा वास येत होता.
७. यज्ञस्थळी वैकुंठातील दैवी सुगंध दरवळतांना आलेल्या विविध अनुभूती
सद्गुरुद्वयींच्या भावामुळे यज्ञस्थळी पुष्कळ प्रमाणात विष्णुतत्त्व कार्यरत झाले होते. त्यामुळे निराळाच दैवी सुगंध दरवळत होता. या दैवीगंधात गोडवा आणि गारवा जाणवत होता. त्यामुळे हा गंध घेतल्याने साधकांची प्राणशक्ती वाढून त्यांच्या मनाचा उत्साहही वाढत होता. हा दैवी सुगंध वैकुंठातील असल्याचे नंतर जाणवले.
८. श्रीविष्णूच्या मूर्तीला वाहिलेल्या निळसर रंगाच्या कमळाचे वैशिष्ट्य
श्रीविष्णूच्या मूर्तीला वाहिलेल्या निळसर रंगाच्या कमळाने १ टक्का विष्णुतत्त्व ग्रहण केले होते. त्यामुळे हे फूल रात्रीपर्यंत टवटवीत दिसत होते.
९. श्रीविष्णूचे वाहन ‘गरुड’ याचे आदल्या दिवशी आणि यज्ञाच्या दिवशी अस्तित्व जाणवून त्याच्यासंदर्भात अनुभूती येणे
विष्णुयागाच्या आदल्या दिवशी ७ फूट लांबीचे आणि ४ फूट रुंदीचे तेजस्वी पिवळसर रंगाचा गरुड परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्या भोवती प्रदक्षिणा घालतांना दिसले. विष्णुयागाच्या दिवशी हा गरुड सूक्ष्मातून यज्ञस्थळी होता. त्यावर चतुर्भुज रूपातील श्रीविष्णु विराजमान झाल्याचे दिसले.
१०. पूजेतील श्रीविष्णूच्या मूर्तीच्या मागील पितळी कमानीचे सूक्ष्म स्तरावर जाणवलेले वैशिष्ट्ये
पूजेतील श्रीविष्णूच्या मूर्तीच्या भोवतीची पितळी कमान सूक्ष्मातून वैकुंठातील सप्तद्वारांच्या भोवती असणार्या सुवर्ण कमानीप्रमाणे दिसत होती.
११. पुरोहितांनी नारायणाष्टक स्तोत्र म्हटल्यावर सूक्ष्म स्तरावर जाणवलेली सूत्रे
पुरोहित नारायणाष्टक स्तोत्र म्हणत असतांना यज्ञज्वालेतून निळसर रंगाचा दिव्य प्रकाश सर्वत्र पसरला. तेव्हा पूजेतील श्रीविष्णूच्या मूर्तीच्या भोवती सूक्ष्मातून निळसर रंगाचे पाणी आणि गुलाबी कमळे असल्याचे दिसले. तेव्हा वातावरणात निळसर दैवी प्रकाश पसरला आणि सद्गुरुद्वयींच्या भोवती असलेल्या निळसर रंगाच्या भोवती गुलाबी रंगाची किनार असणारे आभामंडल कार्यरत झाले. तेव्हा मला अष्टगंधाचा सुगंध आला.
१२. पूर्णाहुतीच्या वेळी जाणवलेली वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे
अ. पूर्णाहुतीच्या वेळी यज्ञज्वालेत साक्षात् लक्ष्मीसहित श्रीविष्णु प्रकटले आणि त्यांनी भद्रद्रव्ये अन् तूप यांची पूर्णाहुती स्वीकारली. ते साधकांवर अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी पृथ्वीवर लवकरच धर्मसंस्थापना होण्याचा शुभाशीर्वाद दिला.
आ. पूर्णाहुतीच्या वेळी वातावरणातील सात्त्विकता वाढल्यामुळे रज-तम यांचे प्रमाण न्यून झाले. त्यामुळ साधकांच्या मनातील अनावश्यक विचार थांबून त्यांच्या मनाची एकाग्रता वाढली.
१५. परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्व आणि ईश्वराचे ‘प्रीती’ अन् ‘व्यापकता’ हे दैवी गुण प्रकटल्यावर आलेल्या अनुभूती
परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांच्यामध्ये विष्णुतत्त्व कार्यरत झाल्यामुळे त्यांचा देह सूक्ष्मातून निळसर रंगाचा दिसत होता. त्यांच्यामध्ये जेव्हा ईश्वराचा ‘प्रीती’ हा दैवी गुण प्रकटला, तेव्हा त्यांच्या हृदयात साधकांविषयीची प्रीती जागृत झाल्यामुळे त्यांच्या हृदयातून गुलाबी रंगाच्या दैवी प्रकाशलहरींचे वायूमंडलात प्रक्षेपण चालू झाले. जेव्हा त्यांच्यामध्ये ईश्वराचा ‘व्यापकता’ हा दैवी गुण प्रकटला, तेव्हा त्यांच्या सूक्ष्म रूपाचा आकार मोठा होऊन ते आकाशाएवढे व्यापक झाले. समस्त ब्रह्मांडांचा वास त्यांच्यामध्ये असल्याचे जाणवले.
कृतज्ञता : ‘देवा, तुझ्या कृपेनेच विष्णुयागाला उपस्थित राहून त्याचे सूक्ष्म परीक्षण करण्याची संधी मला मिळाली’, यासाठी मी तुझ्या चरणी कृतज्ञ आहे.’
– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळेलेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०१९)
|