परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील एकरूपतेच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

सनातनच्या साधकांना जशा अनुभूती परात्पर गुरु डॉक्टरांच्या संदर्भात येतात, तशाच अनुभूती त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यासंदर्भात येतात. यातून ‘गुरुतत्त्व एकच असते’, या परात्पर गुरुदेवांच्या शिकवणीची प्रचीती येते. श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी साधकांच्या साधनेचे शिवधनुष्य लीलया पेलले आहे, तर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी आणि साधकांचा साधनेतील अडथळे दूर करण्यासाठी अहर्निश प्रवास करत आहेत. अनेक साधकांनी सद्गुरुद्वयींना प्रत्यक्ष पाहिलेलेही नाही, तरीही त्यांचा भाव अनुभूतींतून दिसून येतो.

परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणांच्या दर्शनाने जसे भावाश्रू येतात, तसेच भावाश्रू श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणदर्शनाने येणे

श्री. अशोक सारंगधर

५.१.२०२० या दिवशी पहाटे स्वप्नात श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन झाले अन् माझी भावजागृती झाली. त्यांच्या चरणांचे दर्शन होत असल्याने भावाश्रू थांबत नव्हते. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांकडे पाहिल्यावर जसे भावाश्रू येतात, तसेच भावाश्रू सद्गुरुद्वयींच्या चरणांच्या दर्शनाने येत होते.

– श्री. अशोक सारंगधर, फोंडा, गोवा. (३.५.२०२१)


‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ ही दत्ताचीच रूपे आहेत’, असे जाणवणे

‘श्री विष्णुतत्त्व जागृती सोहळा’ हा दत्तजयंतीच्या दिवशी होता. त्याच्या आदल्या दिवशी, म्हणजे १०.१२.२०१९ या दिवशी मला आतून ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ ही दत्ताचीच तीन रूपे आहेत. परात्पर गुरु डॉक्टर श्रीविष्णु, सद्गुरु (सौ.) गाडगीळकाकू शिव आणि सद्गुरु बिंदाताई ब्रह्म आहेत. ही तीन रूपे या दिवशी एकत्र येणार आहेत’, असे वाटले.’

– श्री. संकेत भोवर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


भोजनाच्या वेळी गुरुदेवांसह श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना नैवेद्य दाखवणे

‘गेल्या चार-पाच मासांपासून जेवण्यास प्रारंभ करण्यापूर्वी ते भोजन गुरुदेव, तसेच श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘नैवेद्य’ म्हणून दाखवण्याची कृती माझ्याकडून होत आहे. यापूर्वी माझ्याकडून केवळ गुरुदेवांना नैवेद्य दाखवण्याची कृती होत होती; पण आता आपोआपच वरील कृती होत आहे. माघ पौर्णिमा (१९.२.२०१९) या दिवशी ‘गुरुशक्ति-प्रदान’ सोहळ्यामध्ये गुरुदेवांनी त्यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ म्हणून श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना शक्ती प्रदान केल्याचे पाहिले. तेव्हा गेल्या चार-पाच मासांपासून माझ्याकडून आपोआपच घडणार्‍या वरील कृतीमागील कारण माझ्या लक्षात आले.’

– गुरुसेवक श्री. विजय पाटील, वापी, गुजरात. (१२.२.२०१९)


परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या एकत्रित छायाचित्राकडे पाहून आलेली अनुभूती

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ या तिघांचे एकत्रित छायाचित्र आहे. ते छायाचित्र पाहिल्यावर मला पुढीलप्रमाणे जाणवले.

सौ. लवनिता डूर्

१. मला आध्यात्मिक लाभ झाला.

२. परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्याकडून श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्याकडे प्रकाश जात असल्याचे मला दिसले.

३. ‘देवी हे जसे देवाचेच रूप असते, तसे मला ‘श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई या परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचेच रूप आहेत’, असे जाणवले.

४. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून त्या दोघींकडे शक्ती प्रक्षेपित होत असून परात्पर गुरुदेव त्यांच्याकडून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे दिव्य कार्य करून घेत आहेत’, असे मला वाटले.

५. परात्पर गुरु डॉक्टरांच्या सप्तचक्रांतून या दोन्ही सद्गुरूंच्या सप्तचक्रांमध्ये प्रकाश प्रक्षेपित होत होता. ‘त्या दोघींची सप्तचक्रे परात्पर गुरुदेवांच्या सप्तचक्रांशी जोडलेली आहेत आणि त्यांच्या प्रत्येक चक्रात परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे अस्तित्व आहे’, असे मला जाणवले.

६. ‘या सद्गुरूद्वयींचे वेगळे अस्तित्वच नसून परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले हेच त्यांच्या माध्यमातून सर्व कार्य करत आहेत आणि त्यांनी हे नियोजन या दोघींच्या कित्येक जन्मांपासून करून ठेवले आहे’, असे मला वाटले.

७. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू आणि श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई हे तिघेही एकच आहेत. केवळ या दिव्य कार्यासाठी लागणारी विविध शक्ती घेऊन ते कार्य करत आहेत. त्यांना काहीच होऊ शकत नाही. त्यांना कोणीही कोणत्याही प्रकारे त्रास देऊ शकत नाही आणि त्यांना देवाचे पूर्ण संरक्षण आहे’, असे मला जाणवले.

– सौ. लवनिता डूर्, व्हिएन्ना, ऑस्ट्रिया. (३१.१.२०१८)


‘परात्पर गुरु डॉ. आठवले, श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये छायाचित्र पाहिल्यावर माझा भाव जागृत झाला. ‘दोन्ही बाजूला गंगा-यमुना आणि मध्ये श्रीकृष्ण बसला आहे’, असे मला सूक्ष्मातून जाणवत होते. तेव्हा माझ्या मनात सकारात्मक विचार येऊन माझा भाव जागृत होत होता आणि ‘त्यांच्याकडे बघतच रहावे’, असे वाटत होते.’

– सौ. लक्ष्मी जाधव, फोंडा, गोवा. (२.६.२०२०)


परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर जशी भावजागृती होते, तशी भावजागृती श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदाताई आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळकाकू यांना पाहून होणे

‘डिसेंबर २०१८ मध्ये एकदा मी रामनाथी देवस्थानामध्ये आयोजित केलेल्या एका यज्ञाला उपस्थित राहून घरी परत चालले होते. त्या वेळी अकस्मात् मला श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ चारचाकीतून बाहेर जाण्यासाठी निघाल्याचे दिसले. परात्पर गुरु डॉक्टरांना पाहिल्यावर माझी जशी भावजागृती होते, तशी त्या दोघींना पाहून माझी भावजागृती झाली. त्यांनी माझ्याकडे पाहून स्मितहास्य केले. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळकाकू माझ्याजवळ आल्या आणि माझा हात घट्ट धरून म्हणाल्या, ‘‘तुम्ही आमच्या आहात. आश्रमात कधी येणार आहात ?’’ त्यावर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ म्हणाल्या, ‘‘लवकरच !’’ ‘परात्पर गुरु डॉक्टर हे स्वतः त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असलेल्या श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या वात्सल्यपूर्ण वाक्यांमधून मला आश्वस्त करत आहेत’, असे मला जाणवले.’

– डॉ. रूपाली भाटकार, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.


परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरुद्वयी हे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यात विलीन होत असल्याचे जाणवणे

प.पू. भक्तराज महाराज

‘मी १.७.२०२० ला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी ५.३० वाजता उठून बसलो आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे दर्शन घेतले. त्यानंतर मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणांचे दर्शन झाले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉक्टर प.पू. भक्तराज महाराज यांच्यात विलीन झाल्याचे दिसले. नंतर श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांचे दर्शन झाल्यावर त्यासुद्धा प.पू. भक्तराज महाराज यांच्यात विलीन झाल्याचे दिसले. त्यानंतर श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या चरणांचे दर्शन झाल्यावर त्याही प.पू. भक्तराज महाराज यांच्यात एकरूप झाल्याचे दिसले.’ हे सर्व अनुभवतांना माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते. देवाने मला दर्शन दिल्यामुळे चैतन्य आणि आनंद जाणवला अन् माझा भाव जागृत झाला. देवाने मला ही अनुभूती दिल्याविषयी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’

– श्री. शिवाजी चव्हाण, सनातन आश्रम, देवद


गुरुपादुका पूजनाच्या वेळी परात्पर गुरुदेव आणि सद्गुरुद्वयी या तिघांच्याही चरणांचे पूजन होत आहे, असे जाणवणे

श्री गुरुपादुका

‘महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तस्पर्श केलेल्या गुरुपादुकांची प्रतिष्ठापना २३.३.२०१९ या दिवशी वाराणसी सेवाकेंद्रात करण्यात आली. त्या वेळी ध्यानमंदिरात गुरुपादुकांचे पूजन होत असतांना ‘परात्पर गुरुदेव शेषनागावर पहुडले आहेत. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ याही उपस्थित आहेत अन् या तिघांच्याही चरणांचे पूजन होत आहे’, असे मला जाणवले. ‘संपूर्ण वातावरणामध्ये लाल रंग पसरलेला आहे’, असे मला वाटले.’

– श्री. चंद्रशेखर सिंह, वाराणसी

गुरुपादुका पूजनाच्या वेळी परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे दर्शन होणे

‘परात्पर गुरु डॉक्टरांनी हस्तस्पर्श केलेल्या पादुकांचे पूजन होत असतांना श्रीकृष्ण, परात्पर गुरुदेव, श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचे मला दर्शन झाले. मी ‘श्री लक्ष्मीमातेच्या रूपातील श्रीसत्‌शक्ति(सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या चरणांची पूजा करत आहे’, असे मला वाटले. गुरुपादुका पूजनातील चैतन्यामुळे माझे मन शांत आणि स्थिर झाले. त्या वेळी मला पुष्कळ थंडावा जाणवला.’

– कु. सुनीता छत्तर, वाराणसी

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक