लातूर येथे कोरोनाबाधित रुग्णांच्या मृतदेहाची अदलाबदल
पुरलेला मृतदेह उकरून काढावा लागला
रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा गंभीर दुष्परिणाम ! असे प्रकार टाळण्यासाठी रुग्णालयात नियमावली नाहीत का ? असतील तर त्यांचे पालन न करणार्यांवर लक्ष ठेवणारे कुणी नाही का ? प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालून संबंधितांना शिक्षा करायला हवी !
लातूर – शहरातील गांधी चौक येथील शासकीय सुपरस्पेशालिटी रुग्णालयातून कोरोनाग्रस्त मृतदेहांची अदलाबदल झाल्याचे उघड झाले आहे. एका नातेवाइकाच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर एका रुग्णाचा अंत्यसंस्कारानंतर पुरलेला मृतदेह उकरून बाहेर काढावा लागला.
सौजन्य : ABP माझा
१. शहरातील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात चाकूर तालुक्यातील शेळगाव येेथील धोंडीराम तोंडारे यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तसेच रेणापूर तालुक्यातील आबासाहेब चव्हाण यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. रुग्णालयाने तोंडारे यांच्या नातेवाइकांना आबासाहेब चव्हाण यांचा मृतदेह दिला. तोंडारे कुटुंबियांनी मृतदेह न तपासता त्यावर अंत्यसंस्कारही केले; मात्र चव्हाण यांचे कुटुंबीय रुग्णालयात आल्यानंतर रुग्णालयाने त्यांना धोंडीराम तोंडारे यांचा मृतदेह दिला.
२. ही गोष्ट चव्हाण कुटुंबियांनी रुग्णालयाच्या लक्षात आणून दिल्यानंतर तोंडारे आणि चव्हाण यांच्या मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे समजले. त्यानंतर तोंडारे आणि चव्हाण कुटुंबियांनी आबासाहेब चव्हाण यांचा पुरलेला मृतदेह उकरून काढला आणि चव्हाण कुटुंबियांकडे सोपवला.