नगर येथे वापरलेल्या कोरोना टेस्ट किटसह अन्य साहित्य नदीच्या काठावर फेकल्याचे आढळले
असे करणार्यांना तात्काळ शोधून कठोर शिक्षा देणे आवश्यक आहे. कोरोनाने देशभर थैमान घातले असतांना अशी विघातक कृत्ये करणार्या व्यक्तींना वठणीवर आणणे, हे प्रशासनापुढे एक नवीन आव्हानच आहे !
नगर, ७ मे – श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथून वहाणार्या प्रवरा नदीच्या काठावर वापरलेल्या कोरोना टेस्ट किटसह अन्य साहित्य फेकून दिल्याचे आढळून आले. खासगी रुग्णालय किंवा लॅबचालकाने या साहित्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट न लावता ते येथे उघड्यावर फेकून दिल्याचा संशय आहे. कचरा फेकणार्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येत असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.
याची माहिती मिळाल्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. देविदास चोखर आणि त्यांचे सहकारी यांनी त्या ठिकाणी भेट देऊन पहाणी केली. हा कचरा योग्य पद्धतीने नष्ट करण्याच्या सूचना अधिकार्यांनी दिल्या आहेत. यासह अशा पद्धतीने कुणीही उघड्यावर वैद्यकीय कचरा टाकू नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी चेतावणीही डॉ. चोखर यांनी दिली आहे.