मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी दळणवळण बंदीनंतर बीड येथे मराठा समाजाचा पहिला मोर्चा निघणार !
|
संभाजीनगर – सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला आरक्षण देण्याचे रहित करण्याचा निर्णय दिल्यानंतर राज्यभरात दुसर्या दिवशीही तीव्र पडसाद उमटले आहेत. आरक्षणाच्या मागणीसाठी दळणवळण बंदीनंतर मराठा समाजाचा पहिला मोर्चा बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी ६ मे या दिवशी केली. मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन पातळीवरही लढाई पुढे चालू ठेवली जाणार असल्याचा निर्धार आरक्षण हस्तक्षेप याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केला आहे.
६ मे या दिवशी शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बीड येथे मराठा संघटनांची बैठक झाली. ७ मे या दिवशी बीड येथील जिल्हाधिकार्यांना निवेदन देऊन ८ मे या दिवशी निदर्शने केली जाणार आहेत. बीडमध्ये मोर्चा काढल्यानंतर राज्यभरात मोर्चे काढले जातील, असे मेटे यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या घरासमोर गोवर्या पेटवल्या !
मराठा आरक्षण रहित झाल्याच्या निषेधार्थ राज्याचे गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांच्या पोवई नाक्यावरील कोयना दौलत बंगल्यासमोर काही तरुणांनी ६ मे या दिवशी सकाळी १०.३० वाजता गोवर्या जाळून घोषणा दिल्या, तर सातारा जिल्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्या कार्यालयांवर दगडफेक केली. यात दोन्ही कार्यालयांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.