कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर तिसर्या लाटेचा विचार करा ! – पद्मश्री रमण गंगाखेडकर यांचे आवाहन
अकारण भीती निर्माण करू नका !
नागपूर – आजमितीला कोरोनाची दुसरी लाटच अजून कायम आहे. प्रत्येक ठिकाणी ‘पीक’वर जाण्याचा आणि ओसरण्याचा कालावधी वेगवेगळा रहाणार आहे. दुसरी लाट ओसरणे तर दूरच राहिले, अजून ‘पीक’ वर आलेले नसतांना अकारण तिसर्या लाटेची चर्चा चालू करून भीती निर्माण करणे थांबवले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या साथरोग आणि संसर्गजन्य रोग विभागाचे निवृत्त वैज्ञानिक पद्मश्री रमण गंगाखेडकर यांनी येथे केले.
पद्मश्री गंगाखेडकर पुढे म्हणाले की…
१. राज्याचे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांच्यासह केंद्रीय मंत्रीही तिसर्या लाटेची सिद्धता ठेवण्याविषयी बोलत आहेत; मात्र अजून दुसरी लाटच ओसरायची आहे. आपण वैद्यकीय सेवा देण्यात अपुरे पडत आहोत. औषधे, प्राणवायू, खाटांची कमतरता आहे. असे असतांना इतरत्र लक्ष वळवण्यासाठी अशी सूत्रे चर्चेत आणली जातात.
२. ‘स्टेरॉइड’च्या अतीवापरामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते. प्राणवायूची पुष्कळ आवश्यकता असलेल्या रुग्णालाच रेमडेसिविर इंजेक्शनची आवश्यकता असते. निदान झाल्याखेरीज रेमडेसिविर द्यायला नको; कारण त्यात ‘स्टेरॉइड’ असते. तसे केल्याने प्रतिकारशक्ती न्यून होते. इतर विषाणू वा जीवाणू यांचे आक्रमण होऊ शकते. त्यात रुग्ण दगावतो. यासाठी रेमडेसिविरचा अकारण उपयोग टाळला पाहिजे. मागणी अल्प झाली की, रेमडेसिविरचे मूल्य आपोआप अल्प होईल.
३. अजूनही अनेक राज्यांत कोरोना चाचणी करण्याची उपलब्धता नाही. असे असतांनाही चाचणी ‘पॉझिटिव्हिटी रेट’ अधिक आहे. याचा अर्थ कोरोना ‘पीक’ वर आहे, असे म्हणता येत नाही. डोंगर चढायला लागल्यावर सपाट प्रदेश दिसेपर्यंत डोंगर चढून पूर्ण झाला, असे म्हणता येत नाही, तसेच कोरोनाचे आहे. प्रत्येक ठिकाणची स्थिती वेगळी राहील.
४. सर्वसाधारणपणे लाटा ४ मास चालतात. त्याचा प्रभाव अल्प करण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक लोकांनी कोरोना त्रिसूत्रीचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने स्वतः आणि कुटुंब यांचे दायित्व घेतले पाहिजे. प्रत्येकाने इतरांना भेटणे टाळले पाहिजे.
५. कोरोनाचा विषाणू त्याची नवनवीन प्रतिरूपे सिद्ध करतो; पण या नव्या ‘म्युटंट’मुळे कोरोना वाढतो वा अल्प होतो, याचा सबळ पुरावा नाही; कारण त्याच्या नेमक्या परिणामांचा अजून अभ्यास झालेला नाही.