हिंदी महासागरातील व्यापार आणि जहाजांची सुरक्षा !
१. भारताला स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे होऊनही व्यापारासाठी विदेशी जहाजांवर अवलंबून रहावे लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !
‘भारत एक मोठा देश आहे. भारताच्या तिन्ही बाजूंनी समुद्र असून हिंदी महासागर भारतासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. भारताचा ९५ टक्के व्यापार समुद्रमार्गे चालतो. भारताचा १० ते १२ टक्के व्यापार हा स्वत:च्या, म्हणजे भारतीय जहाजांमधून, तर ९० टक्के व्यापार हा इतर देशांच्या जहाजांमधून होतो. त्यात चिनी जहाजांचाही समावेश आहे. अशा प्रकारे भारत विदेशी राष्ट्रांच्या जहाजांवर अवलंबून आहे, हे अतिशय चुकीचे आहे. त्यामुळे या क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण होण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारताने जहाज उभारणी उद्योग विकसित केला पाहिजे.
भारताकडे स्वत:ची १ सहस्र ४०० जहाजे आहेत. ही जहाजे १७ ते १८ मिलियन टन एवढे साहित्य वाहून नेऊ शकतात. भारतीय व्यापार हा त्याहून १० पट अधिक आहे. त्यामुळे भारताला हा व्यापार विदेशी जहाजांच्या माध्यमातून करावा लागतो. या १ सहस्र ४०० जहाजांपैकी १ सहस्राहून अधिक जहाजे ही गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ आणि कर्नाटक या किनारपट्टी असलेल्या राज्यांच्या व्यापारांमध्ये गुंतलेली आहेत. केंद्र सरकार जहाजांमध्ये वाढ करण्यासाठी सागरमाला प्रकल्प राबवत आहे. यात यश मिळत असले, तरी प्रकल्पाची गती वाढवणे आवश्यक आहे.
२. जोखीम स्वीकारून देशाच्या व्यापारामध्ये हातभार लावणारी भारतीय मर्चंट नेव्ही !
सागरी मार्गाने देशांत किंवा विदेशात होणारी मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक ही ‘मर्चंट नेव्ही’च्या (व्यापारी नौदलाच्या) अखत्यारित येते. भारतात १ लाखांहून अधिक लोक मर्चंट नेव्हीमध्ये काम करतात. यात अर्धे अधिकारी असून अर्धे खलाशी आहेत. अनेक भारतीय परराष्ट्रातील मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत आहेत. या क्षेत्रात काम करणार्या लोकांना पुष्कळ जोखीम पत्करावी लागते. काही लोकांना सामुद्री चाचे पकडतात. आजही भारताचे
काही खलाशी किंवा मर्चंट नेव्हीचे कर्मचारी सोमालियन चाच्यांच्या कह्यात आहेत. प्रतिवर्षी ५० ते ६० लोकांचा विविध कारणांनी मृत्यू होतो, तर काही लोक गंभीर घायाळ होतात. ‘सेक्युरिटी ऑफ सी फेअरिंग कम्युनिटी’ ही संस्था घायाळ किंवा मृत पावलेल्या खलाशांच्या कुटुंबाकडे लक्ष पुरवते. या क्षेत्रामध्ये सुरक्षादले, जहाज बांधणी करणारे, बंदरात काम करणारे, मच्छिमार, समुद्रशास्त्रज्ञ, सर्वेक्षण करणारे, सागरी व्यापार करणारे इत्यादी अनेक जण कार्यरत आहेत. हे लोक काम करतात; म्हणून देशाची अर्थव्यवस्था पुढे जात आहे. सध्या कोरोना म्हणजे चिनी विषाणूचा परिणाम समुद्री व्यापारावरही झाला आहे.
३. भारतीय नौदलाची ‘आयमॅक’ ही संस्था आणि तिचे कार्य !
भारतीय नौदलाचे गुडगाव, देहली येथे ‘आयमॅक’ (इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट अँड ॲनालिसिस सेटर) हे केंद्र आहे. ते वर्ष २०१४ मध्ये चालू झाले. या ‘आयमॅक’ची वर्ष २०१८ च्या आत ‘इन्फॉर्मेशन फ्युजन सेंटर’ नावाची नवीन शाखा चालू झाली आहे. ही शाखा भारतीय नौदलाची जहाजे सोडून हिंदी महासागरामध्ये हालचाली करणार्या सर्व जहाजांवर लक्ष ठेवण्याचे काम करते. समुद्रामध्ये चालणार्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांच्यावर ‘जी.पी.एस्.’ किंवा ‘ए.आय.एस्.’ प्रणाली लावण्यात आली आहे. ही जहाजांना दिलेली इलेक्ट्रॉनिक ओळख आहे. या माध्यमातून जहाजांवर लक्ष ठेवण्यात येते.
४. समुद्रामध्ये सामुद्री चाच्यांनी जहाजांवर आक्रमणे करणे आणि त्यांच्यापासून रक्षण करण्यासाठी जगभरातील देशांनी गस्त घालणे
अ. भारतामध्ये ‘नॅशनल मॅरिटाईम डोमेन अवेरनेस सेंटर’ आहे. त्याचे ‘जीओसी’ (जॉईंट ऑपरेशन्स सेंटर) हे उपकेंद्र आहे. ते मुंबई, कोची, विशाखापट्टणम् आणि अंदमान निकोबार येथे कार्यरत आहे. या केंद्राच्या माध्यमातून तेथील जहाजांवर लक्ष ठेवण्यात येते. या केंद्राने नुकतीच वर्ष २०२० मधील माहिती सार्वजनिक केली. त्यानुसार वर्ष २०२० मध्ये सामुद्री चाच्यांकडून जहाजांवर २६७ आक्रमणे झाली. हे चाचे आफ्रिकेच्या पूर्वेकडील सोमालियन सागरी किनार्याकडे किंवा गल्फ ऑफ गिनी येथे आहेत. त्यामुळे गल्फ ऑफ गिनीच्या भागामध्ये जहाजांची वाहतूक करणे अतिशय जोखमीचे झाले आहे. २६७ घटनांपैकी १८८ घटना थांबवणे शक्य झाले; परंतु ७९ घटनांमध्ये अपयश आले आहे.
आ. व्यापारी जहाजांवर लहान-मोठी आक्रमणे होतात, तेव्हा त्याविषयीची माहिती पुढे देण्याचे टाळले जाते. तसे केल्यास अन्वेषण करण्यात पुष्कळ वेळ जातो. त्यानंतरही अन्वेषणातून काय निष्पन्न होईल, हे सांगता येत नाही. जहाजाला ठरलेल्या ठिकाणी जाण्यास विलंब होतो. त्यामुळे त्याचा व्यय वाढतो. या सामुद्री चाच्यांपासून रक्षण करण्यासाठी जगभरातील जहाजे तेथे गस्त घालतात.
इ. वर्ष २०२० मध्ये जगभरातील १४० खलाशांचे अपहरण करण्यात आले. जहाजावरील क्रूंकडे शस्त्रास्त्रे नसतात. त्यांची लढण्याची क्षमता अल्प असते. वर्ष २०१५ मध्ये भारतातील ज्या १०० हून अधिक खलाशांचे अपहरण झाले होते, त्यातील अनेक जण अजूनही सामुद्री चाच्यांच्या कह्यात आहेत. त्यांतील १८ भारतियांना सोडण्यात यश मिळाले आहे; पण अजूनही अनेक जण त्यांच्याकडे आहेत. याविषयी नियमितपणे माहिती मिळत नाही. त्यांच्या सुटकेसाठी भारतीय लोकप्रतिनिधींनी सरकारकडे पाठपुरावा केला पाहिजे. कोणताही भारतीय नागरिक काही कारणांमुळे विदेशात अडकला असेल, तर त्याची त्वरित सुटका करणे, हे आपल्या देशाचे कर्तव्य आहे.
५. अमली पदार्थांची तस्करी ही दारूगोळा आणि बंदुका यांच्या आतंकवादाहून अधिक धोकादायक !
दक्षिण-पूर्व एशियातील देशांसाठी तस्करी ही मोठी समस्या आहे. या देशांमध्ये मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी केली जाते. सहस्रो कोटी रुपयांचे अमली पदार्थ भारतीय किनारपट्टीवर पकडले जातात. ही तस्करी थांबवणे आवश्यक आहे. अमली पदार्थांची तस्करी ही दारूगोळा आणि बंदुका यांच्या आतंकवादाहून अधिक धोकादायक आहे. भारतीय चित्रपटसृष्टीतील अनेक वलंयाकित लोक या अमली पदार्थांच्या विळख्यात सापडलेले आहेत. काही दिवसांपूर्वी आलेल्या एका वृत्तानुसार तेलंगाणातील ५ आमदार अमली पदार्थांच्या मेजवानीमध्ये सहभागी झाले होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांना अटक केली होती. समाजातील श्रीमंत वर्ग अमली पदार्थांच्या आहारी जात असल्याने देशाची फार मोठी हानी होत आहे.
६. सागरी किनारपट्ट्यांचे योग्य प्रकारे संरक्षण केले, तरच भारताला त्याच्या भौगोलिक स्थितीचा लाभ होईल !
‘इन्फॉरमेशन फ्युजन सेंटर’ला अनधिकृत स्थलांतराविषयी ५९० घटना लक्षात आल्या. त्यांनी या घटना भूमध्य समुद्रात ओळखल्या. हा समुद्र युरोपकडे जातो. या घटनांमध्ये काही लोक पकडलेही गेले आहेत. हे सेंटर भूमध्य समुद्राकडे लक्ष का देते ? असा सर्वसामान्य प्रश्न निर्माण होतो; कारण भारताचा समुद्रकिनारा फार मोठा आहे. येथील सुंदरबनपासून समुद्राच्या दिशेने बंगालमध्ये आणि ओेडिशामध्ये मोठ्या प्रमाणात अनधिकृत स्थलांतर होते. बंगाल, ओडिशा आणि तमिळनाडू यांच्या वृत्तपत्रांतील बातम्या वाचल्या, तर येथील किनारपट्ट्या या अनधिकृत बांगलादेशी स्थलांतरितांमुळे ओसंडून वाहत असतात. त्यांच्यावर पाळत न ठेवता आम्ही भूमध्य समुद्रावर लक्ष ठेवतो, हे चुकीचे आहे. जे भारतात घुसखोरी करतात, त्यांना पकडण्याऐवजी आम्ही अमेरिकेचा सागरी किनारा किंवा भूमध्य समुद्राची चिंता वाहतो. फ्युजन सेंटरचे काम चांगले आहे; पण त्यांनी फार दूरवर लक्ष देण्याची आवश्यकता नाही. युरोपची चिंता युरोपला करू द्यावी, अमेरिकेचे काम अमेरिकेला करू द्यावे, तसेच जपान त्याची काळजी करण्यास समर्थ आहे. त्यामुळे आपण बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका यांच्या किनारपट्ट्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे. तेथून मासेमारी बोटीच्या माध्यमातून भारतात मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यापार आणि अमली पदार्थांची तस्करी होते, तसेच आतंकवादीही येतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आपले काम आहे. प्रतिदिन १३ ते १५ सहस्र जहाजे हिंदी महासागरामध्ये हालचाली करत असतात. भारताचे भौगोलिक स्थान अतिशय चांगल्या ठिकाणी आहे. भारताने सागरी किनारपट्ट्यांचे योग्य प्रकारे संरक्षण केले, तरच या भौगोलिक स्थितीचा आपल्याला लाभ होईल. त्यासाठी सागरी सुरक्षा अधिक विकसित करणे आवश्यक आहे.’
– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे.