दळणवळण बंदीविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील ! – अजित पवार
पुण्यात निर्बंधांची कठोर कार्यवाही करणार
पुणे – शहरातील कोरोनाबाधितांची वाढती संख्या आटोक्यात आणण्यासाठी शहरात निर्बंधांची कठोर कार्यवाही करणार असून प्रशासनाला याविषयी सूचना दिल्या आहेत. पुण्यात दळणवळण बंदी लागू करण्याविषयी मुख्यमंत्री निर्णय घेतील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. या आठवड्यात पुण्यात केवळ ग्रामीण भागात रुग्ण वाढले असून स्थिती सुधारत आहे, असेही अजित पवार यांनी या वेळी म्हटले आहे. उच्च न्यायालयाने कोरोनाबाधितांची संख्या अधिक असलेल्या जिल्ह्यांत दळणवळण बंदी लागू करण्याचा विचार करण्याविषयी निर्देश दिले होते. त्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात ७ मे या दिवशी बैठक घेण्यात आली. या बैठकीत लस, ऑक्सिजन, रेमडेसिविरचा पुरवठा, ‘ऑक्सिजन ऑडिट’ तसेच ‘फायर ऑडिट’ यासंदर्भात चर्चा झाल्याचे पवार यांनी सांगितले.
लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग येण्यासंदर्भात बोलतांना अजित पवार यांनी ‘केंद्र सरकारने विदेशी लस आयात करण्यासाठी अनुमती द्यावी’, असे मत व्यक्त केले. तसेच लसीच्या पुरवठ्यासंदर्भात अदर पुनावाला यांच्याशी संपर्क केला असता ते आणखी १०-१२ दिवस तरी परतणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.