‘स्टॅलिन’रूपी संकट !
चार राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेश येथील निवडणुकांचा निकाल हाती लागल्यावर सर्वाधिक चर्चा झाली, ती बंगाल येथील निवडणुकीची. ही निवडणूक प्रतिष्ठेची समजली गेली. त्यामुळे तमिळनाडूतील निकालाकडे काहीसे दुर्लक्ष झाले. येथे सत्ताधारी अण्णाद्रमुकला धूळ चारून द्रमुक पक्षाने निवडणूक जिंकली. या पक्षाचे अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन हे मुख्यमंत्रीपदावर आरूढ होणार आहेत. तमिळनाडूचे राजकारण हे अण्णाद्रमुक आणि द्रमुक या दोघांच्या भोवती फिरत राहिले आहे. द्रमुक पक्ष यापूर्वीच्या निवडणुका पक्षाचे सर्वेसर्वा एम्.के. करुणानिधी यांच्या, तर अण्णाद्रमुक पक्ष जयललिता यांच्या नेतृत्वाखाली लढवत आला आहे. हे दोन्ही नेते हयात नसतांना ही निवडणूक लढवली गेली. द्रमुकने स्टॅलिन यांच्या, तर अण्णाद्रमुक यांनी पलानीस्वामी यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक लढवली. राज्यातील २ दिग्गज नेत्यांच्या अनुपस्थितीत ती लढवली जाणे, हेही या निवडणुकीचे वैशिष्ट्य होते. आता स्टॅलिन सत्तेत आल्यामुळे त्यांच्यासमोरील आव्हानांविषयी चर्चा होत आहे; मात्र त्यांच्या येण्याने राष्ट्रहित आणि हिंदुहित यांच्या दृष्टीने काय फरक पडतो, हेही पहावे लागेल. द्रमुक सत्तेवर येणे हे भारतासाठी आव्हानात्मक असेल; कारण स्वतंत्र द्रविडिस्तानची मागणी करणारे याच पक्षातील आहेत.
‘तमिळनाडूवर अण्णाद्रमुकने राज्य करावे कि द्रमुकने ?’ असा प्रश्न निरर्थक आहे; कारण या राज्यात राष्ट्रवाद किंवा हिंदुत्व या सूत्रांना काहीच किंमत दिली जात नाही. तमिळनाडूमध्ये आतापर्यंतच्या राजकारण्यांनी ‘आमची वेगळी तमिळी संस्कृती’, असे जनतेच्या मनावर बिंबवले. त्यामुळे या कथित तमिळी संस्कृतीचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी जो पक्ष आश्वासने देतो किंवा पोटतिडकीने बोलतो, तो निवडणुकीत बाजी मारतो, असे आतापर्यंतचे चित्र आहे. एम्.के. स्टॅलिन यांनी या सूत्रावरच जोर दिला. ‘अण्णाद्रमुक पक्ष हा केंद्रातील भाजप सरकारचा गुलाम आहे’, हे सूत्र स्टॅलिन यांनी जोरकसपणे मांडून अण्णाद्रमुक आणि भाजप यांच्या जवळीकीवर टीका केली. या सूत्राचा त्यांना लाभ झाल्याचे त्यांना मिळालेल्या यशातून दिसून येत आहे.
अण्णाद्रमुक सत्तेत असतांना राज्यातील धर्मांतराच्या कारवाया वाढल्या. या कारवायांविषयी तेथील हिंदुत्वनिष्ठांनी आवाज उठवूनही प्रशासनाने त्याची नोंद घेतली नाही. अण्णाद्रमुकच्या कार्यकाळात तमिळनाडू इस्लामिट स्टेटचा नवा अड्डा बनत होता. त्यामुळे मागील ५ वर्षे या पक्षाने हिंदुहितासाठी काय केले, हा प्रश्न ओघाने येतोच. दुसरीकडे द्रमुक पक्षाची विचारसरणी ही हिंदुद्वेषावर आधारित आहे. या पक्षाकडून रावणाचे उदात्तीकरण आणि प्रभु श्रीरामचंद्रांचा सातत्याने अवमान करण्याचे प्रकार याआधीही घडले आहेत. पक्षाच्या हिंदुविरोधी मोहिमेला खतपाणी घालण्याचे काम करुणानिधी यांनी केले. आता त्यांचाच कित्ता स्टॅलिन पुढे चालवत आहेत. स्टॅलिन यांच्या कार्यकाळात तमिळनाडूला भारतापासून तोडण्याचा प्रकार घडल्यास आश्चर्य वाटणार नाही. तमिळनाडूची सद्यःस्थिती पहाता तेथील हिंदुत्वनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी यांची अवस्था ‘आगीतून फुफाट्यात’ अशी झाली आहे. हिंदुद्वेषाने पछाडलेले स्टॅलिन तमिळनाडूत सत्तेवर आल्यानंतर भविष्यात तेथील हिंदूंची स्थिती कशी असेल, हे येणारा काळच सांगेल. या कठीण काळात तग धरून रहाण्यासाठी हिंदूंच्या परिणामकारक संघटनासह हिंदूंनी धर्मबळही वाढवणे आवश्यक !