कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना बुरशीजन्य आजारांचा विळखा !
-
डोळे आणि दात यांच्या समस्या उद्भवू शकतात !
-
८ जणांचा मृत्यू, १३ जणांचे डोळे काढले !
संभाजीनगर – कोरोनाचा आजार झाल्यानंतर उपचार घेऊन घरी परतलेल्या अनेक रुग्णांना फंगल इन्फेक्शन म्हणजे बुरशीजन्य आजाराचा विळखा बसत असल्याचे समोर आले आहे. या नव्या संसर्गामुळे डोळ्यांच्या समस्या, जबड्यांचे विकार यांमध्ये भर पडली आहे. महानगरपालिकेच्या वतीने आयोजित शहरातील आधुनिक वैद्यांच्या बैठकीमध्ये हे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. आधुनिक वैद्यांनी दिलेल्या माहितीनुसार या नव्या संसर्गामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे, १३ जणांचे डोळे काढावे लागले, तर जवळपास ९६ जणांच्या जबड्यावर शस्त्रक्रिया करावी लागली आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीने सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.
याविषयी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, कोरोनामुळे रोगप्रतिकारशक्ती अल्प होते. अनियंत्रित मधुमेह, त्याचे निदान लवकर झाले नाही, तर हा आजार जीवघेणा ठरू शकतो; मात्र योग्य वेळी उपचार घेतले, तर आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो. कोरोना प्रतिबंधक उपचार घेतल्यानंतर अचानक बुरशी यायला चालू होते. प्रथम नाकापर्यंत ही बुरशी सिद्ध होते. पुढे जाऊन ही हळूहळू शरीरात इतर अवयवांवर येऊ लागते. त्यानंतर ती डोळ्यांपर्यंत पसरते याकडे जर दुर्लक्ष केले, तर ही बुरशी मेंदूपर्यंत जाऊन रुग्ण बेशुद्ध पडू शकतो आणि त्यातूनच त्याला अर्धांगवायू होणे किंवा मृत्यू होण्याचा धोका वाढतो.
अशी आहेत लक्षणे…
फंगल इन्फेक्शनचा प्रारंभ नाकापासून होत असून त्यानंतर हळूहळू डोळे, मेंदूपर्यंत पसरत जातो. याची लक्षणे प्रामुख्याने दिसून येतात. ज्यामध्ये श्वास कोंडणे, काळ्या बुरशीचा चट्टा नाक आणि टाळू येथे आढळणे. दात दुखणे, जबड्याला असह्य वेदना होणे, डोळे दुखणे, डोळे सुजणे किंवा दृष्टी कमजोर होणे ही लक्षणे आढळत आहेत. त्यामुळे बुरशी डोळ्यांपर्यंत आल्यानंतर डोळे काढणे हा एकमेव पर्याय शेष रहातो. हा आजार उद्भवल्यास रुग्णाने तातडीने दुर्बिणीद्वारे नाकाची पडताळणी करून घ्यावी, नाकातील स्रावाची बुरशी, जंतूसाठी पडताळणी करावी, तसेच डोळे आणि सायनस यांमधील बुरशी जंतुसंसर्ग शोधण्यासाठी सीटी स्कॅन आणि एम्.आर्.आय. करून घ्यावा, असे डॉ. नीता पाडळकर यांनी सांगितले.