कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?
‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
कोविड केंद्रात एका दिवसासाठीचे शुल्क १५ ते २५ सहस्र रुपये !
नागपूर – कोरोना महामारीच्या उद्रेकात सर्वसामान्य नागरिक होरपळून निघत असतांना या आजारावरील उपचाराच्या नावाखाली शिक्षणसम्राट आणि पंचतारांकित उपाहारगृह व्यावसायिक यांनी ठिकठिकाणी महागडी कोविड केंद्रे चालू केली आहेत. या केंद्रात १५ ते २५ सहस्र रुपयांपर्यंत शुल्क आकारले जात आहे. विशेष म्हणजे लोकप्रतिनिधींनी या केंद्राचे उद्घाटन केले आहे. येथील उपचार शुल्क गरिबांना परवडणारे नाही. (खासगी कोविड केंद्र चालू करून तेथे गरीब लोकांची लुबाडणूक होत असतांना प्रशासन याकडे लक्ष का देत नाही ? प्रशासनाने या कोविड केंद्रांची पडताळणी करून लोकांची लुबाडणूक करणार्या दोषी केंद्रचालकांवर कठोर कारवाई करणे अपेक्षित आहे ! – संपादक)
१. मध्यमवर्गीय कुटुंबातील कुणी कोरोनाबाधित झाले, तर त्यांना सरकारी रुग्णालयात जाण्याविना पर्याय नाही. तेथे खाटा उपलब्ध नाहीत, घरी उपचार करण्यासाठी जागा नाही. बाजारात औषध नाही. त्यामुळे त्यांच्या उपचाराची सोय करणे हे खरे तर सरकार, तसेच लोकप्रतिनिधी यांचे दायित्व ठरते; पण तसे न होता प्रत्येक जण स्वार्थ साधून घेतो.
२. खाट नसल्याने रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ लागल्यावर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी एकाच वेळी खाटा वाढवण्यासाठी सर्वांचेच साहाय्य घ्यायला प्रारंभ केला. यातून खाटांची संख्या वाढून गरीब लोकांना उपचार मिळावे, हा हेतू साध्य होणे अपेक्षित होते; पण यात दिसणारी नफेखोरी ओळखून तथाकथित शिक्षणसम्राट, पंचतारांकित उपाहारगृह व्यावसायिक आणि इतर लोक यांनी या क्षेत्रात शिरकाव केला. अनेक उपाहारगृहांनी ‘कोविड केअर सेंटर’ चालू केले आहेत.
३. शहरातील एका मोठ्या शिक्षण संस्था समूहाने वर्धा मार्गावरील एका पंचतारांकित उपाहारगृहात असे केंद्र चालू केले. केंद्रात एका दिवसासाठीचे दर १५ ते २५ सहस्र रुपये आहेत. हे दर श्रीमंत आणि अतीश्रीमंत यांनाच परवडणारे आहेत. रेल्वे स्थानकाजवळही अशाच प्रकारे एका उपाहारगृहाने ‘कोविड केअर सेंटर’ चालू केले आहे. तेथे सामान्य प्रभागसाठी प्रतीदिन ७ सहस्र रुपये, ‘सेमी डिलक्स रूम्स्’चे १० सहस्र आणि ‘डिलक्स रूम’चे १२ सहस्र प्रतीदिन रुग्णांकडून घेतले जाणार आहेत.
‘व्हेंटिलेटर’चे प्रतीदिन ३ सहस्र रुपये आणि प्राणवायूसाठी प्रतीदिन १ सहस्र ५०० रुपये वेगळे आकारले जाणार आहेत. वर्धा मार्गावरही एका शिक्षण संस्थेचे कोविड सेंटर आहे. तेथील शुल्क आकारणीमुळे रुग्ण त्रस्त आहेत. या सर्व ठिकाणचे दर फलक पाहिल्यावर तेथील सुविधा गरिबांसाठी नाही, हेच स्पष्ट होते.
या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य म्हणाले, ‘‘एका ३०० फुटांच्या घरात ५-६ लोक रहातात. तेथे कोरोना झाला, तर त्यांनी कुठे जावे ? त्यांच्या व्यवस्थेसाठी खासदार निधीतून ‘कोविड केअर सेंटर’ला पैसे का देण्यात आले नाहीत ? झोपडपट्टीतील लोक तर घरीच मृत्यूमुखी पडत आहेत. ज्या लोकांना आवश्यकता नाही, जे अनेक खोल्यांच्या बंगल्यात रहातात, त्यांच्यासाठी उघडलेल्या केंद्राचे लोकप्रतिनिधींनी उद्घाटन करणे योग्य नाही. कार्पोरेट लोक तर कोविड सेंटरच्या नावाने व्यवसाय करत आहेत.’’ |
कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत. आरोग्य साहाय्य समितीपत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१. संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१० ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org |