मिरज येथे कोरोनावरील रॅपिड अँटीजन चाचणीचा बनावट अहवाल देणारा तरुण गजाआड
सांगली – कोरोनावरील रॅपिड अँटीजन चाचणीसाठी पडताळणी न करताच कोरोना नसल्याचा बनावट अहवाल देणार्या तरुणास स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने रंगेहात पकडून गजाआड केले. न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. स्वप्निल सुरेश बनसोडे हा तरुण मिरजेतील सिनर्जी रुग्णालयात माहिती तंत्रज्ञान विभागात काम करतो. त्याच्याकडून आणखी २ बनावट अहवाल जप्त करण्यात आले आहेत. या संशयिताने दिलेले असे अनेक बनावट अहवाल ई-पाससाठी वापर होत असल्याचेही पडताळणीत लक्षात आले आहे. (असे बनावट अहवाल देणारे जनतेच्या आरोग्याशीच खेळत आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. – संपादक) या कामासाठी संशयित एक सहस्र रुपये घेत असून पुढील पडताळणीत आणखी माहिती मिळण्याची शक्यता असल्याची माहिती येथील पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली.