संभाजीनगर खंडपिठाकडून कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांना नोटीस

महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे प्रकरण

कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर

संभाजीनगर – महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधात प्रविष्ट करण्यात आलेली तक्रार संगमनेर (जिल्हा नगर) येथील जिल्हा सत्र न्यायालयाने रहित केली आहे. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात याचिकाकर्त्या रंजना गवांदे यांनी अधिवक्ता जितेंद्र पाटील आणि नेहा कांबळे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठात याचिका प्रविष्ट केली आहे. यावर खंडपिठाने ४ मे या दिवशी ह.भ.प. इंदुरीकर महाराज आाणि नगरचे जिल्हा शल्य चिकित्सक यांना नोटीस बजावली आहे. रंजना गवांदे यांनी ‘ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या विरोधातील तक्रार रहित करू नये’, अशी मागणी याचिकेद्वारे केली आहे. खंडपिठाचे न्यायमूर्ती मंगेश पाटील यांनी या प्रकरणाची सुनावणी ८ आठवड्यांनंतर ठेवली आहे.

कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांनी त्यांच्या कीर्तनात केलेल्या एका विधानावरून त्यांच्यावर ‘पी.सी.पी.एन्.डी.टी.’ कायद्याच्या कलम २२ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता. प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी या संदर्भात कार्यवाही केली होती. या विरोधात ह.भ.प. इंदुरीकर महाराजांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली होती. सत्र न्यायालयाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचा आदेश रहित केला होता.