बनावट धनादेश वटवणार्या टोळीचा सूत्रधार देहली येथून कह्यात !
कायद्याचे भय नसलेले गुन्हेगार ! गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळे ते सराईत होतात !
नगर – बनावट धनादेश तयार करून त्याआधारे वेगवेगळ्या अधिकोषांतून पैसे काढणार्या पुण्याच्या टोळीला नगरमध्ये कह्यात घेतले. या टोळीचा मुख्य सूत्रधार विजेंद्रकुमार उपाख्य विजेंद्र रघुनंदनसिंग दक्ष (दक्षिण देहली) याला नगर पोलिसांनी देहलीतून कह्यात घेतले. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता ७ मेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
नगरमधील स्टेट बँकेच्या सावेडी शाखेत अडीच कोटींचा बनावट धनादेश घेऊन आरोपी आल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी विजेंद्र कुमार याच्या ६ सहकार्यांना कह्यात घेतले. त्यांच्याकडील ६ भ्रमणभाष, वेगवेगळ्या आस्थापनांचे शिक्के, विविध अधिकोषांचे कोरे धनादेश, वेगवेगळ्या नावांनी भरलेले धनादेश असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी सराईत गुन्हेगार असून त्याच्याकडून महाराष्ट्र तसेच अन्य राज्यांतील विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक मिथुन घुगे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.