उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करणार ! – भाजप नेत्याची चेतावणी
पुणे – बारामती शहर आणि तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे; पण तालुक्यातील आरोग्य यंत्रणा काही विशिष्ट राजकीय व्यक्ती आणि संस्था यांच्या हाती एकवटली आहे. ही यंत्रणा काही निवडक व्यक्तींसाठी राबत असल्याचे चित्र तयार झाले आहे. यामध्ये तात्काळ सुधारणा केली जावी, अन्यथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करण्याची चेतावणी भाजप नेते दिलीप खैरे यांनी दिली आहे.
कोरोनावरील उपाययोजनेत शहरी-ग्रामीण असा भेदभाव केला जात आहे. तालुक्यातील कोविड रुग्णांची संख्या ३५० वर पोचलेली आहे. आरोग्य यंत्रणेवर प्रचंड ताण आहे, तर दुसर्या बाजूला रेमडेसिविर इंजेक्शन किंवा काही औषधे वेळेवर मिळत नसल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे प्रशासनाने रेमडेसिविर इंजेक्शनचा रुग्ण संख्येनुसार न्याय पुरवठा करावा, खासगी रुग्णालयांच्या देयकांचे लेखापरीक्षण करावे, प्रत्येक मंडलामध्ये कोविड चाचणी केंद्र चालू करावे, उपचारांतील साधनसामुग्री पुरवतांना शहर-ग्रामीण, गरीब-श्रीमंत असा दुजाभाव त्वरित थांबवावा अशा मागण्या खैरे यांनी केल्या आहेत.