शक्य त्या सर्व मार्गांनी मराठा आरक्षणाची भरपाई देण्याचा प्रयत्न करू ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई – मराठा बांधवांच्या प्रदीर्घ, संयमी आणि ऐतिहासिक संघर्षाला सर्वोच्च न्यायालयात यश मिळेल, अशी आमची निश्चिती होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून राज्यशासन पुढील भूमिका निश्चित करील. सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला जे नाकारले आहे, त्याची भरपाई शक्य त्या सर्व मार्गांनी करून देण्याचा राज्यशासनाचा प्रयत्न राहील, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली. पवार पुढे म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय आणि निराशाजनक आहे. मागासवर्गीय आयोगाचे अनुमोदन असूनही असा निर्णय येणे धक्कादायक आहे. देशातील अन्य राज्यांत आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांच्या पुढे असतांनाही मराठा आरक्षणासाठी त्याचा विचार न होणे, हे आकलनापलीकडचे आहे. मराठा बांधवांना न्याय आणि त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी राज्यशासनाला जे शक्य आहे, ते सर्व केले जाईल. त्यांच्या मनातील अन्यायाची भावना दूर करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राज्यशासन करील. राज्यातील कुठल्याही समाजघटकावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही. मराठा समाजाने आतापर्यंत शांततापूर्ण, संयमी आणि लोकशाही मार्गाने लढा दिला आहे. आताही त्यांनी ही भूमिका कायम ठेवावी. कोरोनाच्या संकटकाळात सामजबांधवांचा जीव धोक्यात न घालणे, हे आपले दायित्व आहे.’’