राज्यात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्याविषयीचा अहवाल २ मासांत सादर करणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री
मुंबई – राज्यात नवीन शैक्षणिक धोरण कसे राबवता येईल, याचा अभ्यास करून सूचना करण्यासाठी डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेला ‘टास्क फोर्स’ येत्या २ मासांत अहवाल सादर करेल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापिठाच्या २३ वा वार्षिक दीक्षांत समारोह सोहळा ४ मे या दिवशी ‘ऑनलाईन’ पद्धतीने साजरा करण्यात आला. या वेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना त्यांनी ही माहिती दिली. या कार्यक्रमात राज्यपाल आणि कुलपती भगतसिंह कोश्यारी हेही सहभागी झाले होते. या सोहळ्यात २१५ उमेदवारांना ‘पी.एच्.डी’ प्रदान करण्यात आली, तर २२ सहस्र २८५ विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या.