हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने हनुमान जयंती निमित्त ‘ऑनलाईन’ सोहळा !
रामनवमीप्रमाणेच हनुमान जयंतीच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने आयोजित ‘ऑनलाईन’ सोहळ्यात धर्मप्रेमींनी सक्रीय सहभाग घेतला. हनुमानाचा जप, श्रीराम आणि हनुमान यांची आरती, मारुतिस्तोत्र, हिंदु जनजागृती समितीच्या कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन, हनुमंताची मानसपूजा असे सर्वत्रच्या कार्यक्रमाचे स्वरूप होते. काही ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचने घेण्यात आली. काही ठिकाणी सकाळी ६ ते ६.३० या वेळेत आयोजित कार्यक्रमाला धर्मप्रेमी सहकुटुंब उपस्थित होते. अनेक ठिकाणी मंदिरांच्या ध्वनीक्षेपकावरून हनुमानाचा जप ऐकवण्यात आला, तर काही ठिकाणी संपूर्ण कार्यक्रमही ऐकवण्यात आला.
हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हनुमंताकडे शक्ती, बुद्धी आणि बळ मागूया ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती
कोल्हापूर – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी हनुमंताकडे शक्ती, बुद्धी आणि बळ मागूया, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. धर्मप्रेमी, जिज्ञासू आणि ‘सनातन प्रभात’चे वाचक यांच्यासाठी आयोजित सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातनच्या साधिका सौ. मेघा जोशी यांनी केले. या वेळी ४५० हून अधिक हनुमानभक्त ‘ऑनलाईन’ जोडलेले होते. या वेळी हनामुनाचा श्लोक म्हणून हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी त्याला साकडे घालण्यात आले.
सोलापूर
येथे झालेल्या ‘ऑनलाईन’ सोहळ्यात ४६० हून अधिक जिज्ञासू आणि धर्मप्रेमी ऑनलाईन सहभागी झाले होते. सनातन संस्थेच्या ६९ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. दीपाली मतकर यांनी हनुमंतांची मानसपूजा सांगितली, तर धर्मप्रेमी श्री. विक्रम लोंढे यांनी सूत्रसंचालन केले. या वेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरात जाता आले नसले, तरी घरी राहून हनुमान जयंतीचा सोहळा अनुभवता आला याविषयी सहभागी झालेल्या हनुमानभक्तांनी कृतज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी काही धर्मप्रेमी आणि जिज्ञासू यांनी सोहळ्यामध्ये आलेल्या अनुभूती सांगितल्या.
पुणे जिल्हा
अ. चिंचवड आणि नाशिक रस्ता : येथे हनुमान जयंतीनिमित्त ४८ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ ५७१ जिज्ञासूंनी घेतला. तसेच ५२ ठिकाणी हनुमानाच्या सामूहिक नामजपाचे ‘ऑनलाईन’ आयोजन करण्यात आले. याचा लाभ येथील ५९२ जिज्ञासूंनी घेतला.
आ. पुणे शहर आणि भोर : येथे हनुमान जयंतीनिमित्त ११ ठिकाणी ‘ऑनलाईन’ प्रवचनांचे आयोजन करण्यात आले. या प्रवचनाचा लाभ ३५६ जिज्ञासूंनी घेतला. तसेच ४२ ठिकाणी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ सामूहिक नामजपाचा लाभ १ सहस्र ५९५ जिज्ञासूंनी घेतला. येथे हनुमान जयंतीच्या दिवशी ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या सामूहिक सत्संग सोहळ्याला १२२ जिज्ञासू उपस्थित होते.
सांगली
सांगली येथे ‘ऑनलाईन’ आयोजित केलेल्या सोहळ्यात ३०० हून अधिक हनुमानभक्तांची उपस्थिती होती. हिंदु जनजागृती समितीच्या सौ. राजश्री तिवारी यांनी जिज्ञासूंना मार्गदर्शन केले. या वेळी सौ. राजश्री तिवारी म्हणाल्या की, रामराज्य स्थापन करण्याच्या कार्यातील हनुमानाचे योगदान, तसेच रामभक्ती ही अनुकरणीय आहे. हनुमान जयंतीनिमित्त हाच आदर्श घेऊन युवा पिढीने बलोपासना करण्याचा संकल्प करावा.
व्यष्टी आणि समष्टी सेवा परिपूर्ण करून गुरुकृपेस पात्र व्हा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये
कोल्हापूर – जो ईश्वराचा परमभक्त आहे, त्याचा योगक्षेम भगवंत स्वत: वहातो. हनुमान हा श्रीरामाचा परमभक्त होता. हनुमंतामध्ये दृढ श्रद्धा, भक्ती, शरणागतभाव यांसह अनेक गुणांचा समुच्चय होता. साधकांनीही पुढाकार घेऊन आणि भावपूर्ण सेवा करणे, हेच गुरूंना अपेक्षित आहे. तरी परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी व्यष्टी आणि समष्टी सेवा परिपूर्ण करून गुरुकृपेस पात्र होऊया, असे मार्गदर्शन सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी केले. हनुमान जयंतीच्या निमित्ताने साधकांसाठी आयोजिलेल्या ‘ऑनलाईन’ सत्संग सोहळ्यात त्यांनी वरील मार्गदर्शन केले.
हनुमान जयंतीला जाणीवपूर्वक ‘जन्मोत्सवा’ची ‘पोस्ट’ प्रसारित करणार्यांचे हिंदु जनजागृती समितीचे किरण दुसे यांच्याकडून प्रबोधन !हनुमान जयंतीला जाणीवपूर्वक ‘जन्मोत्सव’ म्हणून त्याचे समर्थन करून ‘पोस्ट’ बनवून ४ हून अधिक ‘व्हॉटस्ॲप’ गटात प्रसारित करणार्यांचे समितीचे श्री. किरण दुसे यांनी प्रबोधन केले. या वेळी श्री. दुसे यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’मधील माहितीचा संदर्भ देत ‘जन्मोत्सव न म्हणता जयंतीच म्हणणे कसे योग्य आहे’, असे सांगितले. |
विशेष
|
पहाटेच्या कार्यक्रमासाठी उद्योजक आणि अधिवक्ते यांची उपस्थिती !कोल्हापूर येथे समितीच्या धर्मशिक्षणवर्गाला उद्योजक आणि अधिवक्ते उपस्थित असतात. त्यांच्यासाठी हनुमान जयंतीच्या निमित्ताने आयोजित ऑनलाईन विशेष सत्संगात कोल्हापूर, सातारा आणि पुणे येथील अनेक उद्योजक अन् अधिवक्ते सहभागी झाले, तर यातील काही जण सहकुटुंब सहभागी झाले. |
अभिप्राय
|
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |