कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकार्यांकडून जिल्हाधिकार्यांच्या आदेशाच्या विसंगत आदेश निर्गमित
सातारा, ५ मे (वार्ता.) – कोरेगाव (जिल्हा सातारा) येथील मुख्याधिकारी विजया घाडगे यांनी सातारा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाला विसंगत पत्र सिद्ध करून ते प्रसिद्ध केले आहे. सध्या ते सामाजिक संकेतस्थळांच्या माध्यमातून कोरेगावातील विविध प्रसिद्धीगटांमध्ये फिरत आहेत. कोरेगाव मुख्याधिकार्यांच्या या कृतीमुळे नागरिक गोंधळात आहेत.
जिल्हाधिकारी यांच्या आदेशाच्या विसंगत काढलेल्या आदेशात मुख्याधिकारी यांनी म्हटले आहे की, ३ मे या दिवशी व्यापार्यांनी २ वेळा लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र, तसेच प्रति १५ दिवसांनी आर.टी.पी.सी.आर्. किंवा कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवणे आवश्यक आहे, तरच दुकान उघडता येईल. आवश्यक प्रमाणपत्रे जवळ न आढळल्यास तात्काळ दुकान बंद करण्याची कार्यवाही करण्यात येईल. याउलट जिल्हाधिकार्यांनी काढलेल्या आदेशात व्यापारी आर.टी.पी.सी.आर्. किंवा कोरोना चाचणी निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र जवळ ठेवून दुकान उघडू शकता असे म्हटले आहे. कोरेगाव मुख्याधिकार्यांवर कारवाईची मागणी नागरिक करत आहेत. (प्रशासकीय अधिकार्यांनी आदेश देतांना सूसूत्रता ठेवल्यास जनतेचा गोंधळ होणार नाही. – संपादक)
कोरेगाव नगरपंचायतीचे अनेक अधिकारी आणि कर्मचारी तोंडाला मास्क न लावता गावात फिरतांना आढळून येतात; मात्र मास्क लावला नाही, सामाजिक अंतर राखले नाही अशी कारणे सांगून सामान्य नागरिक, व्यापारी यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. (संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे. – संपादक)