कोरोना : जनतेच्या ससेहोलपटीला कारणीभूत कोण ?

‘अशा आपत्काळात जिवंत रहाण्यासाठी भगवंताचे भक्त बना आणि साधना वाढवा. अन्य कुणीही नाही, तर भगवंतच वाचवील !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची होत आहे परवड !

गोवा – गोव्यात काही ठिकाणी कोरोनाबाधित रुग्णाचा मृतदेह नेण्यासाठी शववाहिका मिळत नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांची परवड होत आहे. म्हार्दाेळ येथील एका कोरोनाबाधित रुग्णाचे फोंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू असतांना मृत्यू झाला. मृतदेह शवागारातून स्मशानभूमीपर्यंत नेण्यासाठी शववाहिका उपलब्ध नसल्याने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना मृतदेह शवागारात ठेवून शववाहिकेसाठी ताटकळत रहावे लागले. उपजिल्हा रुग्णालयाने मृतदेह पीपीई किटमध्ये गुंडाळून दिला; मात्र शववाहिका देण्यास नकार दर्शवला. फोंडा नगरपालिकेकडे आणि एका सामाजिक संघटनेकडे शववाहिकेसाठी संपर्क साधला असता तिथेही नकार मिळाला. खासगी २ रुग्णवाहिकांना संपर्क साधला असता त्यांनीही नकार दर्शवला. मृतदेह स्मशानभूमीपर्यंत पोचवावा कसा ? असा बाका प्रसंग संबंधित कुटुंबियांसमोर उभा राहिला. ही व्यथा गावातील एका पंचसदस्याला सांगितल्यावर त्याने त्वरित त्याच्याकडील रुग्णवाहिकेचे रूपांतर कोरोना मृतदेह वाहून नेण्याच्या शववाहिकेत केले. मृतदेह पोचवल्यानंतर त्या पंचसदस्याने शववाहिकेचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) केले.

कोविड रुग्णालयात भरती करण्यास एक लाख रुपये घेणार्‍या डॉक्टरांना अटक

रुग्णसेवेऐवजी रुग्णांकडून पैसे लाटणार्‍या आधुनिक वैद्यांवर कठोर कारवाई करण्यासमवेत त्यांच्या शिक्षणात धर्मशिक्षणाचा समावेश केल्यास त्यांची नीतीमत्ता वाढेल.

पिंपरी (पुणे) – येथील महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात रुग्णाला भरती करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाइकांकडून एक लाख रुपये घेतल्याच्या प्रकरणी ‘स्पर्श’ रुग्णालयाचे डॉ. प्रवीण जाधव, वाल्हेकरवाडी येथील पद्मजा हॉस्पिटलचे डॉ. शशांक राळे आणि डॉ. सचिन कसबे यांना पोलिसांनी कह्यात घेतले. या प्रकरणी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात २ मे या दिवशी तक्रार दिली. यानुसार ही कारवाई करण्यात आली.

२३ एप्रिल या दिवशी पहाटे सुरेखा अशोक वाबळे (रा. चिखली गाव) यांच्यावर पद्मजा हॉस्पिटलमध्ये उपचार चालू होते. त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ऑटो क्लस्टर येथील कोविड रुग्णालयात भरती करून घेण्यासाठी पैशांची मागणी केली होती. कोविड रुग्णालयात खाट मिळवून देतांना त्यांची फसवणूक झाली. याविषयी महापालिकेच्या महासभेत सविस्तर चर्चा झाल्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या महापौर माई ढोरे यांनी या संदर्भात तक्रार करण्याचे आदेश पालिका आयुक्तांना दिले होते.

या कोविड रुग्णालयाचे संचालन करणार्‍या ‘फॉर्च्युन स्पर्श हेल्थ केअर’च्या व्यवस्थापनास आयुक्तांनी आणखी एक दणका दिला. ‘स्पर्श’ने आता पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील, इतर भागातील कोरोनाबाधित रुग्णांना ऑटो क्लस्टर येथे थेट भरती करून घेऊ नये. पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयाने संदर्भित केलेल्या रुग्णांनाच भरती करून घ्यावे, असा आदेश आयुक्त राजेश पाटील यांनी दिला आहे.

कोरोनाच्या काळात आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.

संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : arogya.sahayya@hindujagruti.org