कोरोनाबाधितांना विनामूल्य रिक्शा सुविधा पुरवण्यासाठी मुंबईतील शिक्षक दत्तात्रय सावंत यांचा पुढाकार !
मुंबई – घराशेजारी रहाणार्या कोरोनाबाधित वृद्ध आजींना रात्री त्रास होत होता. त्यांना रुग्णालयात नेण्यास कुणीही सिद्ध नव्हते. घाटकोपरमधील श्री. दत्तात्रय सावंत यांनी त्यांना स्वतःच्या रिक्शातून रात्री रुग्णालयात पोचवले. या प्रकारानंतर त्यांनी कोरोना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्यासाठी विनामूल्य रिक्शा सेवा चालू केली.
१. श्री. दत्तात्रय सावंत हे शिक्षक असून ते शाळेत अल्प वेतनावर काम करतात. कुटुंबाच्या आर्थिक घडीसाठी रिक्शा चालवतात. कोरोनाबाधित रुग्णाला रुग्णालयात किंवा घरी सोडल्यावर ते रिक्शा ‘सॅनिटाईज’ करतात, तसेच पीपीई किट घालूनच रिक्शा चालवतात. इतर रिक्शाचालकही त्यांचे कौतुक करत आहेत. स्थानिक परिसरातील नागरिकांसह सामाजिक माध्यमांवरही त्यांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.
२. स्थानिक नगरसेवक सूर्यकांत दळवी यांनी त्यांना पीपीई किट आणि रिक्शात फवारणी करण्यासाठी ‘सॅनिटाईझर’ उपलब्ध करून दिले.
३. ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी दत्तात्रय सावंत यांचा सत्कार केला. ‘कोरोनाचे संकट संपेपर्यंत जनसेवेचे हे कार्य चालू ठेवणार आहे’, असे दत्तात्रय सावंत यांनी सांगितले.