पुणे येथे मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियांकडून आक्रमणाचा प्रयत्न
|
पुणे, ३ मे – जिल्ह्यातील आळेफाटा परिसरात गोरक्षक तथा मानद पशूकल्याण अधिकारी श्री. शिवशंकर स्वामी यांच्यावर गोमाफियांकडून आक्रमणाचा प्रयत्न करण्यात आला. श्री. स्वामी यांचे वाहनचालक आणि प्रशासकीय सुरक्षारक्षक यांच्या प्रसंगावधानामुळे कोणताही अघटित प्रकार घडला नाही. गोमाफियांचा उद्दामपणा इतका होता की, त्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच श्री. स्वामी यांना धक्काबुक्की करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यासह ‘इस स्वामीको मार डालो, ये हम लोगोंको धंदा करने नही देगा ।’, अशी धमकीही दिली. याविषयी श्री. शिवशंकर स्वामी यांनी आळेफाटा पोलीस ठाण्यात गोमाफियांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. त्यानुसार आळेफाटा पोलिसांनी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
१. आणे गावात कसायांनी श्री. स्वामी यांचे वाहन अडवून ‘स्वामी को आज मार डालो । ये आज जिंदा नही बचना चाहिये ।’, असे ओरडत त्यांच्यावर आक्रमण केले. श्री. स्वामी तेथून निसटून आळेफाटा पोलीस ठाण्याच्या दिशेने निघाले. तरीही कसायांनी पाठलाग करणे सोडले नाही.
२. रस्त्यात राजूरी गावातील गतिरोधकामुळे श्री. स्वामी यांच्या वाहनाचा वेग अल्प झाला, तेव्हा गोमाफियांनी श्री. स्वामी यांच्या वाहनासमोर स्वतःचे वाहन आडवे लावून श्री. स्वामी यांचे वाहन थांबवले.
३. यानंतर वाहनातून उतरलेल्या ६-७ जणांनी श्री. स्वामी यांच्या वाहनावर लोखंडी पाईप, लाकडी दांडके आणि रस्त्यावर पडलेले दगड मारून त्यांच्या वाहनाची हानी करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तरीही श्री. स्वामी यांनी मनोधैर्य थोडेही डगमगू न देता सोबतच्या सहकार्यांचेही मनोधैर्य वाढवले आणि आक्रमणाच्या ठिकाणाहून आळेफाटा पोलीस ठाण्यात गेले.
४. गोमाफियांनी श्री. स्वामी यांना पोलीस ठाण्याच्या आवारात गाठून तेथे त्यांना वरील धमकी दिली.
या घटनेनंतर समस्त गोरक्षक, गोप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ तरुण मोठ्या संख्येने आळेफाटा पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले होते. समस्त हिंदु आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आणि श्री. शिवशंकर स्वामी यांनी जमलेल्या गोरक्षक तरुणवर्गाला शांतता राखण्याचे आणि आपापल्या निवासस्थानी परत जाण्याचे आवाहन केले. समस्त गोरक्षक आणि गोप्रेमी यांनी ‘पोलीस प्रशासनाने या घडलेल्या निंदनीय प्रकाराविषयी गोमाफियांविरुद्ध कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा या कसायांना आम्ही आमच्या पद्धतीने धडा शिकवू’, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.
क्षणचित्रे
१. या घटनेचा खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील गावागावांतील सर्व गोरक्षक, हिंदुत्वनिष्ठ संघटना अन् गोप्रेमी यांनी तीव्र निषेध व्यक्त करत स्वतः श्री. स्वामी यांच्या संरक्षणासाठी पुढे येण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
२. ‘एकाही गोवंशाची कत्तल होऊ देणार नाही’, असा दृढ संकल्प गोरक्षकांनी केला.