अमरावती जिल्ह्यातील १०६ गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी !

जिल्ह्यात प्रतिदिन आढळत आहेत ९०० कोरोनाबाधित रुग्ण !

सौजन्य : PTI

अमरावती – जिल्ह्यातील १४ तालुक्यांमधील १०६ गावे कोरोनाने सर्वाधिक प्रभावित गावांच्या सूचीत समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. महसूल विभागाने हा आदेश काढला आहे. जिल्ह्यात प्रतिदिन सरासरी ९०० कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. प्रशासनाच्या विविध उपाययोजनानंतरही रुग्णांच्या संख्येत घट होतांना दिसत नाही. १० हून अधिक रुग्ण असलेल्या गावांमध्ये बाहेरील नागरिकांना सीमेवरच थांबवण्याचा आदेश महसूल विभागाने दिला आहे. या गावांमध्ये आरोग्य यंत्रणा सिद्ध करण्यात आली आहे.

गृहविलगीकरणातील रुग्ण घराच्या बाहेर आढळल्यास २५ सहस्र रुपयांचा दंड !

गृहविलगीकरणातील रुग्ण घराच्या बाहेर आढळल्यास त्याला २५ सहस्र रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. या गावांतील ये-जा करण्यासाठीचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत. अतीमहत्त्वाच्या कामासाठी ये-जा करणार्‍या लोकांची नोंद ठेवली जात आहे. सर्व प्रकारची दुकाने बंद रहाणार असून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या व्यक्तींच्या नावाची नोंद तहसील कार्यालयात करावी लागणार आहे. नियमांचे पालन न करणारे नागरिक अथवा व्यावसायिक यांच्यावर दंडाची कठोर कारवाई केली जाणार आहे. अतीमहत्त्वाच्या कामासाठी अनुमती घ्यावी लागणार आहे, तसेच गावांतील सर्व दुकाने पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याची दक्षता घेण्यात येत आहे.

सहकारी बँकेला १० सहस्र रुपयांचा दंड !

भातकुली येथील सहकारी अधिकोषासमोर नागरिकांची पुष्कळ गर्दी आढळून आल्याने तहसीलदार नीता लबडे यांनी अधिकोषाला १० सहस्र रुपयांचा दंड ठोठावला आहे. या अधिकोषासमोर नागरिकांनी सुरक्षित अंतराच्या नियमाचे पालन केले नव्हते, तसेच अधिकोषानेही कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कार्यवाही केली नव्हती.