पुण्यातील आरोग्यव्यवस्था नेमकी कुणासाठी ? – आम आदमी पक्षाचा सवाल
पुणे – येथे रुग्ण संख्या वाढत असतांना ऑक्सिजनच्या खाटा उपलब्ध नाहीत, व्हेंटिलेटर खाटा मिळत नाहीत. त्यामुळे मृत्यूमुखी पडणार्यांचे प्रमाण वाढले आहे. आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते रुग्णांना महापालिकेच्या हेल्पलाईन आणि डॅशबोर्डवरील उपलब्ध माहितीच्या आधारे खाटा मिळवून देण्यात साहाय्य करत आहेत, मात्र त्यांना व्हेंटिलेटर खाटा मिळवून देण्यात अपयश येत आहे. त्यामुळे जनतेला उपचार मिळणे हा हक्क असेल तर ही आरोग्य व्यवस्था नक्की कुणासाठी काम करते ? असा संतप्त सवाल आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. याविषयी आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती, डॉ. मनीषा नाईक यांच्याशी चर्चा केल्यावर डॅशबोर्डवर ताजी स्थिती दिसत नसल्याचे दिसून आले.
पुण्यात हेल्पलाईनवरून खाटा मिळवून देण्यासाठी साहाय्य केले जात असले तरी त्याच वेळी सर्व खासगी रुग्णालये आणि सरकारी कोविड सेंटरमध्ये रुग्णांची थेट भरती होत आहे. गंभीर रुग्णाला अत्यावश्यक व्हेंटिलेटर सज्ज खाटा थेट रुग्णालयांकडून भरल्या जात आहेत. त्यामुळे या जागा हेल्पलाईनवर उपलब्ध होत नाहीत असे दिसले. मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही तातडीने रुग्ण आणि खाटांचे नियोजन करावे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली आहे.