सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोरोनाविषयीच्या घडामोडी
जिल्हा रुग्णालयातील ‘एक्स-रे’ तंत्रज्ञाचे कोरोनामुळे निधन
सिंधुदुर्ग – जिल्हा रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांचे ‘एक्स-रे’ काढणारे ‘एक्स-रे’ तंत्रज्ञ (टेक्निशियन) इम्रान शहा (वय ३० वर्षे) यांचे कोरोनामुळे निधन झाले. त्यामुळे कोरानाबाधितांवर उपचार करणार्या कर्मचार्यांमध्ये खळबळ माजली आहे.
मसुरे पोलीस ठाण्याच्या पोलिसांकडून गरजूंना जीवनावश्यक साहित्याचे वाटप
मालवण – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत तालुक्यातील मसुरे पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्या १४ गावांमध्ये सेवा बजावत असतांना या परिसरातील १५ गरजू कुटुंबांना या पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार पी.बी. नाईक, कॉन्स्टेबल हरिश्चंद्र जायभाय यांनी एक मास पुरेल इतक्या जीवनावश्यक वस्तू देऊन एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी चालू केलेल्या कोरोनामुक्त रुग्णांना विनामूल्य घरी सोडण्याच्या सेवेचा २६ कुटुंबियांनी लाभ घेतला
सिंधुदुर्ग – जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा घरी जातांना येणार्या अडचणी लक्षात घेऊन शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यातील एक बोलेरो गाडी रुग्णांना घरी सोडण्यासाठी दिली आहे. ओरोस येथील छोटू पारकर मित्रमंडळाच्या पुढाकाराने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. गेल्या ८ दिवसांत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना घरी घेऊन जाण्यासाठी जिल्ह्यातील २६ कुटुंबियांनी या योजनेचा लाभ घेतला. कोरोनामुक्तीच्या लढ्यात आमदार नाईक यांचा सेवाभावी उपक्रम रुग्णांसाठी लाभदायी ठरत आहे. शिवसैनिक अमित भोगले यांनी ही सेवा देतांना अत्यंत तळमळीने साहाय्य केल्याविषयी आमदार नाईक यांनी त्यांचे कौतुक केले आहे.
कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना रुग्णालयातून सोडल्यानंतर त्यांना अनेकदा ‘कोरोनाचा रुग्ण’ या नजरेतूनच पाहिले जाते. यामुळे घरी जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था होत नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातून कोरोनामुक्त रुग्णांना वेळेत घरी पोचता यावे आणि कोणताही आर्थिक भुर्दंड सोसावा लागू नये, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.